#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७ 

By शेखर पाटील | Published: December 27, 2017 12:56 PM2017-12-27T12:56:27+5:302017-12-27T18:56:46+5:30

टाइम या विश्‍वविख्यात नियतकालीकाने दरवर्षाप्रमाणे २०१७ या वर्षात लाँच झालेल्या सर्व उपकरणांमधून टॉप-१० गॅजेटची यादी जाहीर केली आहे.

# BestOf2017 - Top 10 Gadgets of 2017 | #BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७ 

#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७ 

Next

टाइम या विश्‍वविख्यात नियतकालीकाने दरवर्षाप्रमाणे २०१७ या वर्षात लाँच झालेल्या सर्व उपकरणांमधून टॉप-१० गॅजेटची यादी जाहीर केली आहे. या वर्षात जगभरातील विविध टेक कंपन्यांनी शेकडो उपकरणे ग्राहकांना सादर केली. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे अर्थातच स्मार्टफोन होय. याशिवाय लॅपटॉप, टॅबलेट, संगणक, कॅमेरा, गेमिंग कन्सोल्स, व्हीआर हेडसेट अशा विविध वर्गवारीत या उपकरणांना सादर करण्यात आले आहेत. यातून टाईमने १० आघाडीच्या उपकरणांची निवड जाहीर केली आहे. 

१- निंतेंदो स्वीच (गेमिंग कन्सोल)
निंतेंदो स्वीच या मॉडेलने गेमिंगच्या क्षेत्रात एक नवीन पर्वास प्रारंभ केला आहे. आजवर गेमिंगला होम आणि पोर्टेबल या प्रकारात विभाजीत करण्यात आले होते. अर्थात कुणीही एक तर पीसी, लॅपटॉप वा गेमिंग कन्सोलच्या माध्यमातून गेम खेळू शकत होते. अन्यथा पोर्टेबल प्लेअरच्या माध्यमातून अगदी कुठेही याला खेळता येत होते. मात्र निंतेंदो स्वीच या मॉडेलमध्ये दोन्ही प्रकारात गेमिंगचा आनंद घेता येत असल्याने हे उपकरण क्रांतीकारक मानले जात आहे. याचमुळे याला टाईमने आपल्या २०१७ या वर्षातील उपकरणांच्या यादीत पहिले स्थान प्रदान केले आहे.

२- अ‍ॅपल आयफोन एक्स (स्मार्टफोन) 
फेस आयडी या अतिशय भन्नाट फिचर्ससह आयफोन एक्स या मॉडेलने अ‍ॅपलच्या स्मार्टफोन उत्पादनातील परंपरेला कायम ठेवत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे, दीर्घ काळपर्यंत चालणारी बॅटरी, मोठा आणि अतिशय दर्जेदार डिस्प्ले आदी अनेकविध फिचर्स यात प्रदान करण्यात आले आहे. यामुळे टाईमच्या यादीत या स्मार्टफोनला दुसरे स्थान मिळाले आहे.

३- मायक्रोसॉफ्ट सरफेस (लॅपटॉप)
मायक्रोसॉफ्टने या वर्षी सादर केलेल्या सरफेस लॅपटॉपमध्ये अनेक लक्षणीय फिचर्स आहेत. यात प्रामुख्याने अतिशय उत्तम दर्जाचे डिझाईन, दीर्घ काळपर्यंत चालणारी बॅटरी तसेच विंडोज १० प्रणाली आदींचा समावेश आहे. यामुळे याला युजर्सची पसंती मिळाली असून अर्थातच टाईमनेही या उपकरणाला तिसरे स्थान प्रदान केले आहे.

४- डिजेआय स्पार्क (मिनी ड्रोन)
या वर्षात ड्रोन्सचे अनेक मॉडेल्स लाँच करण्यात आले. यातील डिजेआय या विख्यात कंपनीने सादर केलेल्या स्पार्क या मिनी ड्रोनला टाईमच्या यादीत थेट चौथे स्थान मिळाले आहे. हे ड्रोन नवखा व्यक्तीदेखील सहजपणे हाताळू शकतो. यासाठी रिमोट कंट्रोलची आवश्यकताही नाही. अगदी हाताच्या हालचालींनी याला नियंत्रीत करता येते. अर्थात याचे मूल्यदेखील किफायतशीर आहे.

५- सॅमसंग गॅलेक्सी एस८ (स्मार्टफोन)
या वर्षी स्मार्टफोन उत्पादनातील चुरस नवीन पातळीवर पोहचली. चीनी कंपन्यांनी मारलेल्या धडकीतही सॅमसंगने आपली आघाडी कायम ठेवली आहे. यात गॅलेक्सी एस८ या मॉडेलच्या लोकप्रियतेचा मोठा हातभार ठरला आहे. यात उत्तम दर्जाच्या डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. 

६- एसएनईएस क्लासीक (डेडिकेटेड गेमिंग कन्सोल) 
सुपर निंतेंदो एंटरटेनमेंट सिस्टीम म्हणजेच एसएनईएस क्लासीक या गेमिंग कन्सोलने गेमींग विश्‍वाचे लक्ष वेधून घेतले आहे. यासोबत २१ अत्यंत लोकप्रिय गेम्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. नव्वदच्या दशकात तुफान लोकप्रिय ठरलेल्या निंतेंदोच्या व्हिडीओ गेम्सच्या आठवणी यातून जाग्या होत असल्याने याला गेमर्सचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे.

७- नवीन अमेझॉन इको (स्मार्ट स्पीकर)
या वर्षात डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट आणि यावर आधारित स्मार्ट स्पीकरच्या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या क्षेत्रात अमेझॉन कंपनीला गुगल आणि अन्य कंपन्यांनी आव्हान निर्माण केले आहे. तथापि, अमेझॉनच्या दुसर्‍या पिढीतील नवीन इको या स्मार्ट स्पीकरला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. विशेषत: अवघ्या ९९ डॉलर्समध्ये हा स्मार्ट स्पीकर मिळत असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

८- एक्सबॉक्स वन एक्स (गेमिंग कन्सोल)

२०१७ या वर्षात गेमिंगच्या क्षेत्रात अनेक घडामोडी झाल्या. यात मायक्रोसॉप्टने सादर केलेल्या एक्सबॉक्स वन एक्स या गेमिंग कन्सोलला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. यात फोर-के क्षमतेच्या गेमिंगची अनुभूती घेता येणार आहे. किफायतशीर दरात उच्च दर्जाच्या पीसी गेमिंगची अनुभूती या कन्सोलच्या माध्यमातून घेता येत असल्यामुळे याला टाईमने आपल्या यादीत आठवे स्थान प्रदान केले आहे.

९- अ‍ॅपल वॉच ३ (स्मार्टवॉच)
अ‍ॅपल कंपनीने यावर्षी लाँच केलेल्या अ‍ॅपल वॉच ३ या स्मार्टवॉचला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. हे कंपनीचे पहिलेच फोर-जी एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारे स्मार्टवॉच होय. यावरून थेट कॉल करण्यासह एसएमएसची सुविधादेखील आहे. यात बॅरोमॅट्रीक अल्टीमीटर दिलेले असून याच्या मदतीने किती पायर्‍या चढल्या? याची अचूक माहितीदेखील मिळते. अ‍ॅपलच्या तिसर्‍या पिढीतील या स्मार्टवॉचमध्ये आधीपेक्षा अतिशय वेगवान प्रोसेसर देण्यात आला आहे.

१०- सोनी अल्फा ए७आर III  (कॅमेरा)
सोनी कंपनीने या वर्षी सादर केलेल्या अल्फा ए७आर III  या मॉडेलची आजवरचा सर्वोत्कृष्ट मिररलेस कॅमेरा अशी ख्याती आहे. यात ४२.४ मेगापिक्सल्स क्षमतेचे एक्समॉर आर सीएमओएस सेन्सर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रिकरण शक्य आहे. तर यात तब्बल १६९.२ मेगापिक्सल्स क्षमतेचे छायाचित्र काढता येते.
 

Web Title: # BestOf2017 - Top 10 Gadgets of 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.