सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:32 IST2026-04-09T16:30:15+5:302026-04-09T16:32:07+5:30
जर तुमच्या फोनमध्ये काही विशिष्ट प्रकारचे बेकायदेशीर व्हिडिओ किंवा फाइल्स आढळल्या, तर पोलीस तुम्हाला थेट घरून अटक करू शकतात.

सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
आपण आपल्या कष्टाच्या पैशाने महागडा स्मार्टफोन खरेदी करतो आणि तो आपल्या मर्जीनुसार वापरतो. पण, आपली ही मर्जी कायद्याच्या चौकटीत असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकांना वाटते की मोबाईल आपला आहे, तर आपण त्यात काहीही ठेवू शकतो. मात्र, जर तुमच्या फोनमध्ये काही विशिष्ट प्रकारचे बेकायदेशीर व्हिडिओ किंवा फाइल्स आढळल्या, तर पोलीस तुम्हाला थेट घरून अटक करू शकतात. सायबर कायद्यांतर्गत काही गोष्टी फोनमध्ये साठवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
तुमच्या फोनमध्ये 'हे' व्हिडिओ तर नाहीत ना?
बाल लैंगिक शोषण सामग्री : लहान मुलांशी संबंधित अश्लील व्हिडिओ किंवा फोटो फोनमध्ये ठेवणे, डाऊनलोड करणे किंवा कोणाला पाठवणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. यासाठी POCSO कायद्यांतर्गत कडक शिक्षेची तरतूद आहे. असे व्हिडिओ मोबाईलमध्ये असतील, तर ते तुम्हाला कायमचे तुरुंगात पाठवू शकतात.
विनापरवाना अश्लील व्हिडिओ : एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय बनवलेले किंवा शेअर केलेले खासगी व्हिडिओ फोनमध्ये ठेवणे बेकायदेशीर आहे. 'रिव्हेंज पॉर्न' सारख्या प्रकरणांमध्ये पोलीस तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करतात.
भडकाऊ आणि जातीय द्वेष पसरवणारे व्हिडिओ: जर तुमच्या फोनमध्ये दोन समाजात किंवा धर्मात तेढ निर्माण करणारे, लोकांना दंगलीसाठी भडकवणारे व्हिडिओ आढळले, तर ते देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानले जातात. अशा व्यक्तीवर देशद्रोहापर्यंतच्या कलमांखाली कारवाई होऊ शकते.
दहशतवादी कारवायांचे समर्थन: प्रतिबंधित संघटनांचा प्रचार करणारे किंवा त्यांच्या हिंसक कारवायांचे समर्थन करणारे व्हिडिओ फोनमध्ये ठेवणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. संशयास्पद वाटल्यास पोलीस कोणत्याही वॉरंटशिवाय तुम्हाला ताब्यात घेऊ शकतात.
छुप्या कॅमेऱ्याने शूट केलेले व्हिडिओ : आजकाल स्पाय कॅमेरे किंवा स्मार्ट ग्लासेसचा वापर करून लोकांच्या नकळत त्यांचे व्हिडिओ काढले जातात. विनापरवाना कोणाचेही व्हिडिओ रेकॉर्ड करून ते फोनमध्ये स्टोअर करणे हा गोपनीयतेचा भंग असून त्यासाठी तुरुंगवास घडू शकतो.
पोलीस फोन कधी तपासू शकतात?
सर्वसाधारणपणे पोलीस प्रत्येकाचा फोन तपासत नाहीत. मात्र, जर तुमच्या विरोधात तक्रार आली किंवा तुम्ही एखाद्या संशयास्पद ग्रुपचे सदस्य असाल, तर सायबर पोलीस तुमच्या डिजिटल हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. तसेच, अनेक ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बेकायदेशीर कंटेंटची माहिती आपोआप सुरक्षा यंत्रणांना देतात.