गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:42 IST2025-12-10T11:41:02+5:302025-12-10T11:42:42+5:30
एका चुकीमुळे काही सेकंदात हॅक होईल तुमचा Gmail! चुकूनही ही गोष्ट करू नका, अमेरिकेच्या सायबर एजन्सींचा गंभीर इशारा

गुगलचा 'हा' मेसेज दिसताच समजून जा तुमचं 'Gmail' आलंय धोक्यात! वेळ न घालवता करा 'हे' उपाय
सायबर हल्ल्यांची दुनिया आता पूर्वीपेक्षाही जास्त वेगवान, चाणाक्ष आणि अत्यंत धोकादायक बनली आहे. अमेरिकेच्या सायबर सुरक्षा एजन्सींनी नुकताच Google, Apple आणि Microsoft यांसारख्या मोठ्या टेक कंपन्यांच्या युजर्सना पासवर्ड आणि अकाउंट सुरक्षेबद्दल अत्यंत सावध राहण्याचा गंभीर इशारा दिला आहे. आता हॅकर्स इतक्या प्रगत पद्धतींचा वापर करत आहेत की, तुम्हाला येणारा एक साधा सिक्युरिटी मेसेज देखील तुमच्या अकाउंटला धोका पोहोचवणारा एक मोठा फसवणुकीचा सापळा असू शकतो.
फसव्या सिक्युरिटी मेसेजचा नवा पॅटर्न
गेल्या महिन्यात अॅपल युजर्ससोबत फसवणुकीची एक नवी पद्धत समोर आली होती. यामध्ये हॅकर्स आधी ऑटोमॅटिक सिक्युरिटी मेसेज पाठवायचे आणि लगेचच फोन करून स्वतःला अॅपल सपोर्ट टीमचे सदस्य म्हणून सांगायचे. नेमक्या याच पद्धतीने आता गुगल युजर्सनाही बनावट सिक्युरिटी अलर्ट येत असल्याचे समोर आले आहे.
यासंबंधी फोर्ब्सच्या एका अहवालानुसार, एका रेडिट युजरने प्रश्न विचारला की, हॅकर्स थेट गुगलचा सुरक्षा अलर्ट फोनवर कसा पाठवू शकतात? याचे उत्तर सोपे आहे: कोणताही व्यक्ती तुमच्या ईमेल आयडीचा वापर करून 'अकाउंट रिकव्हरी' प्रक्रिया सुरू करू शकतो. ही प्रक्रिया सुरू केल्यावर, तो अलर्ट आपोआप युजरला पाठवला जातो. म्हणूनच गुगल अशा संदेशांमध्ये स्पष्टपणे नमूद करते की, जर तुम्ही स्वतः ही प्रक्रिया सुरू केली नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा.
थेट फोन करून मागतात कोड
या सायबर फसवणुकीतील सर्वात धोकादायक आणि प्रभावी पद्धत म्हणजे, हे चोर थेट युजरला फोन करतात आणि स्वतःला गुगलच्या सिक्युरिटी टीमचे अधिकारी म्हणून सांगतात. बोलता बोलता ते युजरला विश्वासात घेऊन त्यांचा 'व्हेरिफिकेशन कोड' किंवा 'सिक्युरिटी कोड' मागून घेतात.
जर तुम्ही चुकूनही हा कोड फोनवर किंवा इतर कुठल्याही माध्यमातून शेअर केला, तर तुमचे जीमेल अकाउंट काही सेकंदात हॅक होऊ शकतो आणि हॅकरला तुमच्या संपूर्ण अकाउंटचा अॅक्सेस मिळतो.
कसे राहाल सुरक्षित? या '३' गोष्टी लगेच लक्षात ठेवा
या वाढत्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तुम्हाला फक्त थोडी जागरूकता बाळगण्याची गरज आहे. खालील महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे:
अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका: कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका. विशेषतः जेव्हा ते कॉल करणारे लोक तुमच्याकडून सिक्युरिटी कोड, ओटीपी किंवा पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती मागत असतील, तर ती देऊ नाक. Google, Apple किंवा Microsoft सारख्या मोठ्या कंपन्या कधीही कॉलवर अशी माहिती विचारत नाहीत.
प्रॉम्प्ट आल्यास लगेच दुर्लक्ष करा: तुम्हाला तुमच्या फोनवर किंवा ईमेलवर कोणताही सिक्युरिटी प्रॉम्प्ट दिसला आणि जर तुम्ही स्वतः रिकव्हरी प्रक्रिया सुरू केली नसेल, तर ताबडतोब त्याकडे दुर्लक्ष करा.
कोड शेअर करणे टाळा: तुमचा सिक्युरिटी कोड किंवा कोणताही OTP ईमेल, SMS किंवा व्हाट्सअपवर कोणाशीही शेअर करू नका. तो कोड फक्त तुमच्यासाठी असतो. या साध्या पण महत्त्वाच्या सावधगिरी बाळगल्यास तुम्ही तुमचे डिजिटल जीवन सुरक्षित ठेवू शकता.