अॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अॅप! काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:22 IST2025-10-24T11:22:07+5:302025-10-24T11:22:44+5:30
युजर प्रायव्हसीचे उल्लंघन आणि गंभीर तक्रारींमुळे ॲपलने या दोन्ही ॲप्सना आपल्या जागतिक ॲप स्टोअरमधून अधिकृतपणे हटवले आहे.

अॅपलने उचललं मोठं पाऊल; स्टोअरमधून काढून टाकले 'हे' व्हायरल डेटिंग अॅप! काय आहे कारण?
या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होताच जगभरात व्हायरल झालेल्या 'Tea' आणि 'TeaOnHer' या दोन डेटिंग ॲप्सना ॲपलने मोठा झटका दिला आहे. युजर प्रायव्हसीचे उल्लंघन आणि गंभीर तक्रारींमुळे ॲपलने या दोन्ही ॲप्सना आपल्या जागतिक ॲप स्टोअरमधून अधिकृतपणे हटवले आहे. खास महिलांसाठी तयार केलेले हे ॲप्स आता आयफोन वापरकर्त्यांना एक्सेस करता येणार नाहीत.
प्रायव्हसीच्या नियमांचे उल्लंघन
ॲपल स्टोअरचे हे ॲप्स रातोरात व्हायरल झाले होते, कारण यांमध्ये एक विशेष फीचर होते. युजर्स ज्याला डेट करत आहेत, त्याबद्दलचा फीडबॅक ॲपवर पोस्ट करू शकत होते. या फीडबॅकला 'रेड फ्लॅग' आणि 'ग्रीन फ्लॅग' अशा स्वरूपात दाखवले जात होते.
मात्र, अनेक युजर्सनी या ॲप्सबद्दल गंभीर तक्रारी केल्या, ज्यात प्रायव्हसी नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते. ॲप ॲनालिटिक्स फर्म Appfigures नुसार, ॲपलने या तक्रारींची दखल घेऊन कठोर पाऊल उचलले आहे.
अल्पवयीन मुलांची माहिती सार्वजनिक
याबाबत आलेल्या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांची खासगी माहिती दिसत होती. या ॲप्सच्या डेव्हलपर्सना ॲपलने अनेकवेळा संपर्क साधून वॉर्निंग दिली होती. पण युजर्सच्या तक्रारी वाढतच गेल्या, ज्यामुळे २१ ऑक्टोबर रोजी ॲपलने हे ॲप्स हटवण्याचा निर्णय घेतला.
ॲपलने 'टेकक्रंच' या वृत्तसंस्थेकडे या निर्णयाची पुष्टी करताना सांगितले की, या दोन्ही ॲप्सनी ॲप स्टोअरच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केले आहे. विशेषतः कंटेंट मॉडरेशन, युजर प्रायव्हसी आणि एकूण कंप्लायंस संबंधित नियम तोडले गेले.
'Tea' ॲप २०२३ मध्ये लॉन्च झाले होते, जिथे महिला डेटिंग ॲप्सवर भेटलेल्या पुरुषांबद्दल आपले अनुभव शेअर करत होत्या. पण गोपनीयतेच्या गंभीर मुद्द्यांमुळे आता या दोन्ही व्हायरल ॲप्सचा ॲपलच्या प्लॅटफॉर्मवरील प्रवास थांबला आहे.