Fact Check: Amul देत आहे का 6000 रुपये गिफ्ट? जाणून वायरल WhatsApp मेसेजमागील सत्य
By सिद्धेश जाधव | Updated: October 12, 2021 13:12 IST2021-10-12T13:11:52+5:302021-10-12T13:12:37+5:30
Amul Anniversary Scam: WhatsApp वर एका लिंकसह Amul कडून 6000 रुपये मिळणार असल्याचा मेसेज वायरल होत आहे. हा मेसेज धोकादायक आहे आणि सायबर एक्सपर्ट्सनुसार याद्वारे तुमचा डेटा चोरून फसवणूक देखील होऊ शकते.

Fact Check: Amul देत आहे का 6000 रुपये गिफ्ट? जाणून वायरल WhatsApp मेसेजमागील सत्य
लोकप्रिय मेसेजिंग अॅप Whatsapp चा वापर संवाद साधण्यासाठी केला जातो. परंतु याच अॅपचा वापर फसवणुकीसाठी आणि गुन्हेगारीसाठी केला जातो. बऱ्याचदा व्हॉट्सअॅपवर पैसे, गिफ्ट, मोफत प्रोडक्ट, मोफत रिचार्ज इत्यादी स्वरूपाचे मेसेजेस येतात. अनेक युजर्स मोफत वस्तू मिळवण्याच्या नादात हे मेसेजेस फॉरवर्ड करतात. परंतु नंतर हे मेसेज फ्रॉड असल्याचे समजते. असेच काहीसे आता भारतातील प्रसिद्ध कंपनी अमूलच्या नावावर होत आहे. जर व्हॉट्सअॅपवर अशी एखादी लिंक आली असेल, ज्यात 6000 रुपये मिळण्याचा दावा केला जात आहे, तर सावध व्हा.
Amul अॅनिव्हर्सरी गिफ्ट लिंक
व्हॉट्सअॅपवर एक लिंक वायरल होत आहे, जिच्यावर क्लिक केल्यावर एक वेबसाईट ओपन होते. या वेबसाईट पेजवर Amul चा लोगो आहे. त्याखाली “Amul 75th Aniversary” आणि त्यानंतर मोठ्या अक्षरात “Congratulation” लिहिण्यात आले आहे. त्यानंतर पेजवर काही प्रश्नांची उत्तरे दिल्यास तुम्हाला 6000 रुपये मिळवण्याची संधी मिळेल असे सांगण्यात आले आहे.
फक्त प्रश्न आणि उत्तरांवर हा फ्रॉड थांबत नाही. त्यानंतर ही लिंक तुमच्या 20 मित्रांना किंवा 5 ग्रुप्सना पाठवा म्हणजे तुम्हाला 6000 रुपये मिळतील, असे सांगण्यात येते. हा फ्रॉड जिवंत करण्यासाठी या पेजवर इतर काही लोकांनी आपल्याला 6000 रुपये मिळाल्याचा दावा कमेंट्समध्ये केला आहे.
अमूलने दिले स्पष्टीकरण
जेव्हा अमूलने ट्विट करून या प्रकरणाची दखल घेतली तेव्हा हे प्रकरण उघड झालं. अमूलने एक ट्वीटकरून हा एक बनावट मेसेज असल्याचे म्हटले आहे. Whatsapp आणि इतर सोशल मीडियावर ही SPAM लिंक शेयर केली जात असून यावर क्लिक न करण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. तसेच अमूलने अशी कोणतीही मोहीम सुरु न केल्याची माहिती देखील कंपनीने ट्विटरवरून दिली आहे.