'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:52 IST2025-09-03T14:44:57+5:302025-09-03T14:52:50+5:30
कोरोना काळात अनेक कंपन्यांनी खूप खर्च केला होता. आता त्या कंपन्या पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. ॲमेझॉनचा हा नियम त्याचाच एक भाग आहे.

'पैसे बचाओ' पॉलिसी! ९ ते ५ दरम्यान कर्मचाऱ्यांवर 'वॉच', 'फोनाफोनी'चाही घेणार 'हिशेब'; Amazon मध्ये काय घडतंय?
ॲमेझॉन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम आणला आहे. आता कर्मचाऱ्यांना कंपनीने दिलेला मोबाईल फोन कामासाठी किती वापरला आणि स्वतःच्या खासगी कामासाठी किती वापला हे सांगावे लागणार आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना फोनच्या बिलासाठी दर महिन्याला ५० डॉलर (सुमारे ४००० रुपये) देते. आता, जर कोणी फोनचा वापर खासगी कामांसाठी जास्त करत असेल, तर त्यांना मिळणाऱ्या या पैशांमध्ये कपात केली जाईल. म्हणजेच आता खासगी वापरासाठी मोबाईल वापरला तर पैसेही कमी मिळणार आहेत, याबाबत बिझनेस इनसायडरच्या एक अहवालातून माहिती समोर आली आहे.
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
कोरोना काळात अनेक कंपन्यांनी खूप खर्च केला होता. आता त्या कंपन्या पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. ॲमेझॉनचा हा नियम त्याचाच एक भाग आहे. कंपनीचे नवीन सीईओ (मुख्य अधिकारी) अँडी जॅसी हे संपूर्ण कंपनीच्या कामाची पद्धत बदलत आहेत. ते खर्चावर नियंत्रण आणत आहेत.
फक्त फोनच नाही, तर इतर गोष्टींवरही लक्ष
कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेरगावी जायचे असेल, तर आधी 'त्या प्रवासातून कंपनीला काय फायदा होईल' हे सांगावे लागणार आणि त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच जेवणाचा खर्चसुद्धा आता तपशीलवार लिहून द्यावा लागणार आहे. कंपनीचे पैसे म्हणजे आपले पैसे म्हणून खर्च करायचा आहे असं कंपनीचे मत आहे.
या नियमांमुळे कर्मचारी नाराज असल्याचे समोर आले. 'कंपनी आमच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर खूप जास्त लक्ष ठेवत आहे. यामुळे आपली नोकरी सुरक्षित आहे की नाही, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यांच्या मते, कंपनीकडून मिळणारा फोन ही एक सामान्य सुविधा आहे, त्याचा असा हिशोब ठेवणे योग्य नसल्याचे मत कर्मचाऱ्यांचे आहे.