एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:24 IST2025-12-05T14:23:51+5:302025-12-05T14:24:39+5:30
दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी भारती एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील ₹१२१ आणि ₹१८१ ...

एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी भारती एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमधील ₹१२१ आणि ₹१८१ किमतीचे दोन महत्त्वाचे प्रीपेड डेटा पॅक गुपचूप बंद केले आहेत. हे दोन्ही पॅक ३० दिवसांच्या वैधतेसह येत असल्याने, ग्राहकांमध्ये या प्लॅनना जास्त पसंती होती.
- ₹१२१ चा डेटा पॅक: यात ग्राहकांना एकूण ८GB (६GB बेस डेटा + एअरटेल थँक्स ॲपवर २GB बोनस) डेटा मिळत होता.
- ₹१८१ चा डेटा पॅक: यात १५GB डेटासह एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम (Airtel Xstream Play Premium) सारख्या OTT सेवांचे बंडलिंग फायदे मिळत होते.
कंपनीच्या या निर्णयामुळे, ज्या ग्राहकांना केवळ डेटा टॉप-अपसाठी ३० दिवसांच्या वैधतेचा स्वस्त पर्याय हवा होता, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याऐवजी आता ग्राहकांना जास्त किमतीच्या किंवा कमी वैधतेच्या डेटा पॅकची निवड करावी लागणार आहे.
दरवाढीचे स्पष्ट संकेत
२०२५ मधील टॅरिफ दरवाढीच्या धोरणाअंतर्गत एअरटेलने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. कंपनी सातत्याने आपल्या कमी किमतीच्या योजना पोर्टफोलिओमधून काढून टाकत आहे. यापूर्वी कंपनीने ₹१९९ च्या खालील एंट्री-लेव्हल प्लॅनही महाग केले होते. यामागचा मुख्य उद्देश 'सरासरी महसूल प्रति ग्राहक' वाढवणे हा आहे.
सध्या स्वस्त डेटा पॅक काढून टाकून एअरटेल ग्राहकांना उच्च किमतीच्या आणि जास्त डेटा वापर असलेल्या प्लॅन्सकडे वळण्यास प्रवृत्त करत आहे. दूरसंचार कंपन्यांसाठी एआरपीयू (ARPU) वाढवणे हे महत्त्वपूर्ण असल्याने, भविष्यात मोबाइल रिचार्जचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.