Airtel ग्राहक संकटात; आधार कार्डसह डेटा लीक, हॅकरकडून विकण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 13:17 IST2021-02-03T13:17:09+5:302021-02-03T13:17:38+5:30
Airtel Data leak : जर या हॅकरनी ही डेटा कोणाला विकला तर एअरटेल ग्राहकांसाठी हे धोक्याचे आहे. कारण मोबाईल नंबर आणि आधार नंबरवर बँकेची अनेक कामे होत असतात. पैशांची देवाणघेवाणही होत असते.

Airtel ग्राहक संकटात; आधार कार्डसह डेटा लीक, हॅकरकडून विकण्याचे प्रयत्न
Airtel ग्राहकांसाठी धोक्याची घंटा आहे. एअरटेलच्या वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. यामध्ये ग्राहकांचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता, शहर, आधार कार्ड नंबर, लिंग आदींची माहिती फुटली आहे. हॅकरनी 25 लाख ग्राहकांचा डेटा चोरला आहे. त्यांच्याकडे भारतातील सर्व एअरटेल ग्राहकांचा डेटा असून तो त्यांना विकायचा आहे.
जर या हॅकरनी ही डेटा कोणाला विकला तर एअरटेल ग्राहकांसाठी हे धोक्याचे आहे. कारण मोबाईल नंबर आणि आधार नंबरवर बँकेची अनेक कामे होत असतात. पैशांची देवाणघेवाणही होत असते. डेटा लीक झाल्याचे वृत्त IANS ने दिले आहे. एअरटेलदेखील या हॅकरसोबत चर्चा करत आहे.
एअरटेलनेही डेटा चोरी झालाय का हे तपासले आहे. तसेच हॅकरनी एअरटेलकडेही 3500 डॉलर्सचे बिटकॉईन मागितले आहेत. एअरटेलने हा डेटा तपासला असता तो खरा निघाला आहे. इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहारिया यांनी याची माहिती दिली आहे. हॅकर कंपनीला ब्लॅकमेल करत आहेत. जर मागणी पूर्ण केली नाही तर ते हा डेटा डार्क वेबवर विक्रीला काढणार आहेत. यासाठी त्यांनी एक वेबसाईटही तयार केली असून त्यावर डेटाचे एक सॅम्पल दिले होते. हा डेटा जम्मू आणि काश्मीरच्या एका भागातील आहे. रेड रॅबिट टीम नावाच्या हॅकरने हा डेटा चोरी केला असून सर्व भारतीय एअरटेल ग्राहकांचा डेटा त्याच्याकडे असल्याचा दावा केला आहे.
हॅकरने दिलेली लिंक बंद करण्यात आल्यावने दुसऱ्य़ा लिंकवर पुन्हा डेटा शेअर करण्यात आला आहे. ही माहिती एअरटेलच्या सर्व्हरमधून लीक झाल्याची शक्यता नसून अन्य कोणत्यातरी माध्यमातून हा डेटा लीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्य़े सुरक्षेसाठी ज्या सरकारी संस्था हा डेटा अॅक्सेस करतात त्यांचा वापर केला गेला असण्याची शक्यता राजहारिया यांनी वर्तविली आहे.
महत्वाचे म्हणजे हॅकरने जो डेटा लीक केला आहे त्यातील मोठा भाग हा एअरटेलचा नाहीय. यामुळे कंपनीने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असून आपल्याकडून कोणतीही माहिती हस्तांतरण झाली नसल्याचे एअरटेलने म्हटले आहे. तसेच ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.