एअरटेलनंतर आता जिओचा स्टारलिंकसोबत करार; खरोखरच इंटरनेट प्लॅन परवडणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:15 IST2025-03-12T10:15:15+5:302025-03-12T10:15:55+5:30
Jio-Starlink News: एअरटेल आणि जिओसोबतच्या या भागीदारीला अद्याप सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. यानंतरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु होऊ शकणार आहे.

एअरटेलनंतर आता जिओचा स्टारलिंकसोबत करार; खरोखरच इंटरनेट प्लॅन परवडणार का?
अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकला आता भारतात हातपाय पसरण्यास मोठी मदत मिळणार आहे. एअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने देखील स्टारलिंक या सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरसोबत करार केला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक भारतात येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होती. परंतू, भारत सरकारने त्यांना परवानगी दिली नव्हती. आता त्यांचे मार्ग मोकळे झाले आहेत.
एअरटेल आणि जिओसोबतच्या या भागीदारीला अद्याप सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. यानंतरच भारतात स्टारलिंकची सेवा सुरु होऊ शकणार आहे.
रिलायन्स स्टारलिंकचे इंटरनेट वापरणार नाहीय, तर स्टारलिंकची डिव्हाईस, हार्डवेअर आणि इन्स्टॉलेशनमध्ये मदत केली जाणार आहे. यासाठी ग्राहक जिओच्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकणार आहेत. हे सर्व रिटेल आणि ऑनलाईन स्टोअर्सवर उपलब्ध केले जाणार आहे. थोडक्यात जिओ स्टारलिंकला ही सेवा पुरविणार आहे.
मंगळवारीच एअरटेलनेही स्पेसएक्स सोबत करार केला होता. ज्या भागात वायरलेस इंटरनेट किंवा वायर इंटरनेट उपलब्ध नाही, तिथे स्टारलिंकची सेवा वापरता येणार आहे. या भागात जिओ आणि एअरटेल इतर सर्व प्रक्रिया पार पाडणार आहे.
खरोखरच परवडणार का?
स्टारलिंकची ही इंटरनेट सेवा भारतीयांना खरोखरच परवडणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एअरटेल फायबरचे प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरु होतात, त्यावर जीएसटी पकडला तर महिन्याला ५८८ रुपये मोजावे लागतात. तर जिओच्या फायबरचे प्लॅन हे ७०० रुपयांपासून सुरु होतात. या दोन्हींचा स्पीड हा ५० आणि ३० एमबीपीएस एवढा आहे. मग स्टारलिंक किती पैसे घेईल असाही प्रश्न भारतीयांना पडला आहे. हे पाहता स्टारलिंकची सेवा दुर्गम भागातल्या लोकांना परवडणारी असेल असे वाटत नाही.