मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:46 IST2025-12-04T16:46:10+5:302025-12-04T16:46:43+5:30
अमेरिकेत एका मुलाला मोबाईलच्या चार्जरमुळे विजेचा झटका बसल्याची घटना अमेरिकेतून समोर आली आहे. या दुर्घटनेत त्याचा गळा आणि छाती भाजली आहे.

मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
मोबाईल चार्जरचा वापर करणे तसे सुरक्षित मानले जाते, पण आपल्या एका लहानशा निष्काळजीपणामुळे जीवघेणा अपघात होऊ शकतो. याचीच प्रचिती अमेरिकेत एका घटनेतून आली आहे. अमेरिकेतील एका ८ वर्षीय मुलाला मोबाईल चार्जरमुळे जोरदार विजेचा झटका बसला. हा अपघात इतका भयानक होता की, मुलाच्या गळ्याची आणि छातीची त्वचा प्रचंड भाजली. वेळीच उपचारासाठी मदत मिळाल्याने मुलाचा जीव वाचला. या घटनेमुळे घरात, विशेषतः मुलांच्या आसपास चार्जर वापरताना कोणती खबरदारी घ्यावी, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
चार्जर प्लगमध्ये नीट न लावल्याने प्लग आणि कॉर्डमध्ये तयार झालेल्या गॅपमध्ये मुलाची गळ्यातील चेन अडकली आणि हा अपघात झाला.
नेमके काय घडले?
रिपोर्टनुसार, अमेरिकेतील एका घरात एक्सटेंशन कॉर्डमध्ये मोबाईल चार्जर अडकलेला होता. हा चार्जर कॉर्डमध्ये नीट फिट झालेला नव्हता आणि प्लग व कॉर्ड यांच्यात थोडी जागा तयार झाली होती. त्याच्या बाजूला खेळत असलेल्या ८ वर्षीय मुलाच्या गळ्यातील धातूची साखळी नेमकी या गॅपमध्ये अडकली. साखळी अडकताच मुलाला विजेचा जोरदार झटका बसला. जीव वाचवण्यासाठी मुलाने ताकदीने ती चेन गळ्यातून तोडून दूर फेकली. यामुळे करंटचा धोका टळला आणि त्याचा जीव वाचला. घटनेनंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर भाजलेल्या त्वचेवर उपचार करण्यात आले.
अशा अपघातांपासून वाचण्यासाठी 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा!
मोबाईल चार्जर वापरताना थोडी काळजी घेतली, तर असे भयानक अपघात टाळता येतात. खालील तीन महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा:
झोपताना चार्जर प्लग-इन नको: झोपण्यापूर्वी चार्जर प्लगमधून काढून ठेवा. झोपेत नकळतपणे तुमचा कोणताही धातूचा दागिना किंवा वस्तू चार्जरला स्पर्श करू शकते आणि करंटचा धोका निर्माण होऊ शकतो.
मुलांना प्लगपासून दूर ठेवा: मुलांना पॉवर प्लग्स आणि चार्जरपासून नेहमी दूर ठेवा. अनेकदा पालक मुलांना मोबाईल चार्जिंगला लावायला सांगतात, पण हा निष्काळजीपणा खूप धोकादायक ठरू शकतो.
तुटलेला चार्जर वापरू नका: जर तुमच्या चार्जरची केबल तुटली असेल किंवा कापली असेल, तर त्याचा वापर त्वरित बंद करा. तसेच, जर चार्जर प्लगमध्ये नीट बसत नसेल, तर त्याला दाब देऊन फिट करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, दुसऱ्या प्लगचा वापर करणे सुरक्षित राहील. सुरक्षितता आणि सावधानता बाळगल्यास, आपण आणि आपले कुटुंब अशा अपघातांपासून सुरक्षित राहू शकतो.