अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या सोलापूरच्या तरूणास मुंबई-बांद्रा हायवेवर पकडले
By Appasaheb.patil | Updated: August 25, 2023 18:07 IST2023-08-25T18:07:30+5:302023-08-25T18:07:49+5:30
एमआयडीसी पोलिसांनी तपास करूनही तो आरोपी मिळून न आल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास कामासाठी वर्ग केला.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या सोलापूरच्या तरूणास मुंबई-बांद्रा हायवेवर पकडले
सोलापूर : चार वर्षापूर्वी अल्पवयीन बालिकेचे अपहरण केलेल्या सोलापूरच्या तरूणास पळून जात असताना मुंबई-बांद्रा हायवेवर सोलापूर शहर पोलिस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मोठया शिताफीने पकडले. अंकुश विजय जाधव (वय २४) असे पकडण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चार वर्षापूर्वी एका अल्पवयीन बालिकेस कशाचे तरी आमिष दाखवून अपहरण केले होते. याप्रकरणी पिडितेच्या नातेवाईकांनी १७ जुलै २०१९ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलिसांनी तपास करूनही तो आरोपी मिळून न आल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपास कामासाठी वर्ग केला. त्यानंतर तपास वेगाने सुरू केल्यावर या गुन्ह्यातील आरोपी हा तळोजा, पापडीचा पाडा, सेक्टर नं ४०, नवी मुंबई येथे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला अन् त्यास पकडले. ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. दिपाली काळे, सहा. पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी कक्षाकडील पोलिस निरीक्षक महादेव राऊत, महादेव बंडगर, तृप्ती मंडलिक, रमादेवी भुजबळ, उषा मळगे, सीमा खोगरे, गोरे, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील यांनी यशस्वी पार पाडली.