धोकादायक वळणावर वेगातील मोटारसायकल न आवरल्याने युवक जागीच ठार; एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2022 18:27 IST2022-09-09T18:22:34+5:302022-09-09T18:27:04+5:30
वैराग येथे धोकादायक वळणावर सुसाट चालवत असलेली मोटारसायकल न आवरल्याने खाली पडून युवक जागीच ठार झाला.

धोकादायक वळणावर वेगातील मोटारसायकल न आवरल्याने युवक जागीच ठार; एक जण जखमी
विठ्ठल खेळगी, लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : वैराग येथे धोकादायक वळणावर सुसाट चालवत असलेली मोटारसायकल न आवरल्याने खाली पडून युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली.
यात संग्राम जाधव (वय २७) हा जागेवरच ठार झाला तर अरविंद कदम (वय २८, दोघे रा. मुखेड जि. नांदेड) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबद अधिक माहिती अशी कि, नांदेड जिल्ह्यातील सुमारे आठ दहा कुटुंब कामासाठी शेळगाव (ता. बार्शी) येथे आले आहेत व तेथे विहिर खोदणे, पाईप लाईन खोदणे किंवा मिळेल ते काम करून आपली उपजिविका भागवत आहेत.
दरम्यान शुक्रवार रोजी कामाला सुट्टी घेतल्यामुळे अरविंद व संग्राम हे वैरागच्या बाजारपेठेत आले होते. त्यांचे काम उरकून परत शेळगाव येथे जात असताना वैरागपासून एक किलोमीटर अंतरावर उस्मानाबाद फाट्याजवळ धोकादायक स्वरूपाचे वळण आहे. त्या वळणावर यांच्या मोटारसायकलचा वेग जास्त असल्याने ती नियंत्रणात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला सुरक्षेकरीता लावलेल्या लोखंडी पट्टीवर जावुन जोरदार धडकले. यामध्ये पाठीमागे बसलेला संग्राम उडून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागेवर ठार झाला तर अरविंद हा देखील गंभीर जखमी झाला. याबाबद वैराग पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.