तुमची तक्रार, जबाब आता सेफ राहणार; पोलीस ठाण्यातील कपाटात लॉक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:10 PM2021-12-13T13:10:03+5:302021-12-13T13:10:11+5:30

सोलापूर ग्रामीण पोलीस; कागदपत्रे, फायली ठेवण्यासाठी 'कॉम्पॅक्टर सिस्टिम' अमलात

Your complaint, answer will now be safe; The cupboard in the police station will be locked | तुमची तक्रार, जबाब आता सेफ राहणार; पोलीस ठाण्यातील कपाटात लॉक होणार

तुमची तक्रार, जबाब आता सेफ राहणार; पोलीस ठाण्यातील कपाटात लॉक होणार

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : डागडुजी..नवे बांधकाम..रंगरंगोटीतून आता जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या इमारती सुसज्ज झाल्या आहेत. त्यातच आता कागदपत्रे, फायली व इतर महत्त्वाचे रिपोर्ट व साहित्य जपून ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाने आता नवीन ‘कॉम्पॅक्टर सिस्टिम’ बसविण्यास सुरुवात केली आहे. ‘कॉम्पॅक्टर सिस्टिम’ बसविणारे राज्यातील एकमेव सोलापूर ग्रामीण पोलीस दल असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

आधुनिक काळात प्रशासकीय कार्यालयांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पोलीस दलाचे कार्य हे कागदपत्रांशी संबंधित आणि लेखी स्वरूपाचे असते. प्रत्येक घटनेच्या नोंदी, तपास कामे, जबाब, रजिस्टर, नोंदवही व इतर सर्व प्रकारच्या नोंदी ठेवल्या जातात. वेगवेगळ्या गुन्ह्यांत विविध प्रकारची कागदपत्रे तयार केली जातात, हाताळली जातात तसेच कार्यालयातून बाह्य यंत्रणेशीही संपर्क साधला जातो. त्या सर्व संबंधित कागदपत्रांचे एकत्रित करणे व नीटनीटकेपणा येण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यासाठी 'कॉम्पॅक्टर सिस्टिम' अमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही वेगात सुरू आहे.

 

-----------

डीपीसीतून मिळविला निधी...

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी १ कोटी ३३ लाखांचा निधी मिळाला होता. या निधीतून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यासाठी कॉम्पॅक्टर सिस्टिम (स्लायडिंग कपाट) खरेदी केले आहे. सध्या ही सिस्टिम कार्यान्वित करण्याचे काम प्रत्येक पोलीस ठाण्यात वेगात सुरू असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

-----------

१६ टन जुनी कागदपत्रे केली नाश...

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे तसेच पडलेले कागदपत्रे, फायलीने भरलेले कपाट विशेष मोहीम राबवून रिकामे करण्यात आले. जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांमधील १६ टन जुनी कागदपत्रे, फायली नाश करण्यात आली. यातील काही कागदपत्रांना वाळवी लागली होती, तीही यात नष्ट केली.

-----------

‘कॉम्पॅक्टर सिस्टिम’ बसविणारे राज्यातील पहिले असे सोलापूर ग्रामीण पोलीस दल आहे. या सिस्टिममुळे पोलीस ठाण्यातील सर्व कागदपत्रे, फायली ठेवण्यात सुसूत्रता येईल. शिवाय कार्यालयातील व्यवस्थापन सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.

Web Title: Your complaint, answer will now be safe; The cupboard in the police station will be locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.