सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र यशवंत बाबर यांना केरळमध्ये वीरमरण; पानीवमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 19:02 IST2025-07-22T18:53:50+5:302025-07-22T19:02:25+5:30
बाबर हे गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत होते

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र यशवंत बाबर यांना केरळमध्ये वीरमरण; पानीवमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माळशिरस तालुक्यातील पानीव गावाचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर (वय ५५) यांना कोची (केरळ) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण प्राप्त झाले. गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते.
दरम्यान, त्यांच्या जाण्याने गाव एक शूर, निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे पानीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा आप्तपरिवार आहे. बाबर कुटुंबावर या दुःखद घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचेल तिथून लष्करी वाहनाने मध्यरात्रीपर्यंत पानीव गावात दाखल होणार असून, बुधवारी सकाळी १० वाजता लष्करी इतमामात पानीव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, पानीव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली.
जम्मू व काश्मीर येथे सलग १५ वर्षे देशसेवा करत देशाच्या संवेदनशील आणि सीमेवरील भागात त्यांनी अत्यंत धैर्याने सेवा बजावली. त्यानंतर जैसलमेर (राजस्थान) येथे शुष्क सीमाभागात काम केले. पुणे (महाराष्ट्र) येथे प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या असून सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) येथे दक्षिण भारतात, जबलपूर (मध्यप्रदेश) येथे मध्य भारतात यासह अन्य विविध भागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले. केवळ दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली कोची (केरळ) येथे झाली होती. विशेष म्हणजे, येणाऱ्या एका वर्षातच त्यांची लष्करातून सेवानिवृत्ती होणार होती. परंतु त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.