उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:40 PM2019-09-10T14:40:08+5:302019-09-10T14:43:04+5:30

तीस महिन्यांमध्ये पूर्ण करून घेणार काम; आयुक्त दिपक तावरे यांची माहिती

Work order for the Ujani-Solapur parallel waterway work | उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर

googlenewsNext
ठळक मुद्दे११० किमीचे अंतर, तांत्रिक आराखडा पोचमपाड कंपनी करेलतांत्रिक आराखडा मुंबई आयआयटीकडून तपासून घेणारकंपनीने दरमहा १० किमीचे काम पूर्ण करणे अपेक्षितउजनीपासून कामाला सुरुवात होणारनव्या जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी उपसा अपेक्षित. 

सोलापूर: सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने सोमवारी हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कऑर्डर  दिली. मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे आणि पोचमपाड कंपनीचे कार्यकारी संचालक एम.राव. यांनी  आयुक्त कार्यालयात करारावर सह्या केल्या. काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा दावा महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. औज आणि चिंचपूर बंधारा शहर पाणीपुरवठा स्त्रोतांपैकी एक आहे. या दोन बंधाºयांची क्षमता ०.४२ टीएमसी आहे; मात्र त्यासाठी उजनीतून पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. वर्षाला जवळपास २५ टीएमसी पाणी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम प्रस्तावित करण्यात आले होते. या कामासाठी एनटीपीसीने २५० कोटी तर स्मार्ट सिटी योजनेतून २०० कोटी रुपये मंजूर केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने नोव्हेंबर २०१८ मध्ये ३५९ कोटी रुपयांची निविदा काढली होती. पोचमपाड कंपनीने या कामासाठी ४६४ कोटी रुपये मागितले होते. स्मार्ट सिटी कंपनी आणि पोचमपाड कंपनीमध्ये वाटाघाटी झाल्या.  पोचमपाड कंपनीला ४०५ कोटी रुपयांना हे काम देण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटी कंपनीच्या २९ आॅगस्टच्या बैठकीत वर्कऑर्डर  देण्यास मंजुरी देण्यात आली. सोमवारी करारावर सह्या झाल्या.  

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी, उपअभियंता विजय राठोड, स्मार्ट सिटीचे तपन डंके यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते. एकूण ४०५ कोटी रुपयांचे काम असून त्यावरील कर पाहता ४५० कोटी रुपये लागणार असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे यांनी सांगितले. 

दर महिन्याला दहा किमी काम अपेक्षित 

  • - मूळ आराखड्यातील पाकणी जलशुद्धीकरण केंद्र, रेल्वे क्रॉसिंग, एनटीपीसीच्या परिसरातील चार गावचा पाणीपुरवठा योजना ही कामे योजनेतून होतील. 
  • - ११० किमीचे अंतर, तांत्रिक आराखडा पोचमपाड कंपनी करेल
  • - तांत्रिक आराखडा मुंबई आयआयटीकडून तपासून घेणार
  • - कंपनीने दरमहा १० किमीचे काम पूर्ण करणे अपेक्षित
  • - उजनीपासून कामाला सुरुवात होणार
  • - नव्या जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी उपसा अपेक्षित. 
  • - शेतकºयांना मिळणार पीक नुकसानभरपाई.

पहिल्या जलवाहिनीचे आयुष्यमान संपले
- उजनी ते सोलापूर पहिल्या जलवाहिनीच्या कामाला १९९२ मध्ये मंजुरी मिळाली होती. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने १९९५ साली या कामाला सुरुवात केली. १९९८ साली काम पूर्ण झाले. २००० साली जीवन प्राधिकरणाने ही योजना महापालिकेकडे हस्तांतरीत केली. योजना सुरू झाल्यानंतर जलवाहिनीला नियमित गळती लागत आहे. आता या जलवाहिनीचे आयुष्यमान संपले आहे. जीवन प्राधिकरणने २००४ साली समांतर जलवाहिनीची गरज असल्याचा प्रस्ताव दिला होता. 

टिंगल करणाºयाला हे उत्तर 
- वर्कऑर्डर  दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, आमच्या पक्षातील काही लोकांनी समांतर जलवाहिनीच्या कामाची टिंगल केली होती. काम पूर्ण करून दाखवाच, असे आव्हान काही लोकांनी दिले होते. हा प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या मुलासह २० नगरसेवक बाहेर पडले होते, परंतु मी जिद्दीने हे काम इथपर्यंत आणले आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याचा आनंद आहे. यावेळी सभागृह नेते श्रीनिवास करली उपस्थित होते. 

Web Title: Work order for the Ujani-Solapur parallel waterway work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.