सोलापूर-हैदराबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 08:28 AM2019-04-29T08:28:27+5:302019-04-29T08:32:24+5:30

जिल्हाधिकाºयांनी ठेकेदाराला दिलेली मार्चची मुदतही संपली, काम काही पूर्ण होईना

The work of four-laning of the Solapur-Hyderabad highway was completed | सोलापूर-हैदराबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले

सोलापूर-हैदराबाद महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले

googlenewsNext
ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून काम रखडल्याने येथील वाहनधारकांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहेसुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा मार्ग मोकळा करून गतीने काम पूर्ण व्हावेसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते दहिटणे फाटापर्यंत चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू

सोलापूर : सोलापूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मार्च २0१९ ची मुदत दिली होती. ही मुदतही संपली असून, काम काहीकेल्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरालगतच  मार्केट यार्ड ते नवीन हैदराबाद जकात नाका या परिसरातच काम रखडले गेले आहे. 

सोलापूर -पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूर -हैदराबाद राष्ट्रीय महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून करण्यात येत आहे. दोन ते अडीच वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही या कामास अपेक्षित कालावधीपेक्षा दुप्पट कालावधी लागत आहे. कामाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अरुंद रस्ता तर काही ठिकाणी कच्चा रस्ता ठेवण्यात आल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होताना दिसून येत आहे. 

सोलापूरपासून शंभर किलोमीटरपर्यंतचे काम सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली होत आहे. 
ठेकेदाराकडून विहीत मुदतीत काम पूर्ण होत नसल्याने या कार्यालयाकडून ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली होती. मात्र दिल्ली येथील कार्यालयाकडून पुन्हा या ठेकेदारास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिलेली मुदतही पुन्हा संपल्याने हे काम कधी पूर्ण होणार याबाबत महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कदम यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे या रखडलेल्या कामाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी याबाबत संबंधित अधिकाºयांची दोनदा बैठक घेतली आहे. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत मार्च २0१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यांनी दिलेली ही मुदतही संपल्याने जिल्हाधिकारी याबाबत आता काय भूमिका घेतात, याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. 

खुल्या जागेत ट्रान्स्पोर्टधारकांचे अतिक्रमण 
- मार्केट यार्डपासून ते घरकुलपर्यंत चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खडीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर ट्रान्स्पोर्ट कंपनीकडे आलेले ट्रकही याच ठिकाणी दिवसभर थांबतात. मोकळ्या जागेत या ठिकाणी ट्रान्स्पोर्टच्या ट्रकनी अतिक्रमण केल्याचे दिसते.

धुळीमुळे दुचाकीधारकांचा प्रवास थांबला
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते दहिटणे फाटापर्यंत चौपदरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रमुख रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता खोदण्यात आला आहे. त्यात माती व खडी टाकण्यात आल्याने चारचाकी वाहनांमुळे प्रचंड धुळीचे लोट उडत आहेत. दुचाकीधारकांना धुळीचा त्रास होत असल्याने या महामार्गावरून न जाता दुचाकीधारक अन्य पर्यायी मार्ग अवलंब करताना दिसून येताहेत. घरकुल, मित्रनगर आदी भागातून दुचाकीधारकांची वर्दळ वाढत आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण काम लवकर होणे आवश्यक आहे. मात्र हे करताना कामात गती व सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांपासून काम रखडल्याने येथील वाहनधारकांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचा मार्ग मोकळा करून गतीने काम पूर्ण व्हावे.
-जगदीश अळ्ळीमारे, प्रवासी

Web Title: The work of four-laning of the Solapur-Hyderabad highway was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.