मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार
By विलास जळकोटकर | Updated: June 28, 2023 17:11 IST2023-06-28T17:09:56+5:302023-06-28T17:11:22+5:30
बाथरुमसाठी खाली उतरल्यानं घडली दुर्घटना

मालगाडी रेल्वेच्या चाकाखाली पाय अडकल्यानं महिला जखमी; कुर्डूवाडी स्टेशनवरचा प्रकार
सोलापूर : पंढरपूरकडे रेल्वेनं निघालेली महिला कुर्डूवाडी स्टेशनवर उतरुन बाथरुमसाठी म्हणून खाली उतरुन रेल्वे ट्रकवर थांबल्या असताना अचानक मालगाडी चालू झाली अन् पाय चाकाखाली गेल्यानं योगिता अशोक मोरे (वय- ३५, पळासी, ता. सोयेगाव, जि. संभाजीनगर) ही महिला जखमी झाली. बुधवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली.
यातील जखमी योगिता मोरे या पाचोरा स्टेशनवरुन रेल्वेनं पंढरपूरकडे निघाल्या होत्या. कुर्डूवाडी रेल्वेस्टेशनवर रेल्वे थांबली होती. सकाळी पावणेआठ वाजलेले. बाथरुमसाठी त्या प्लॅटफार्म ३ वर उतरुन रेल्वे ट्रॅकवर उतरल्या होत्या. थांबलेली मालगाडी अचानक सुरु झाली आणि योगिता यांचा डावा पाय रेल्वेच्या चाकाखाली जाऊन त्या जखमी झाल्या.
तातडीने कुर्डूवाडीच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून सकाळी दहा वाजता नातेवाईक उमेश ओझेकर याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्या शुद्धीवर आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.