या कारणासाठी मागितली वायरमनने लाच; पुढे काय झाले, वाचा बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:29 IST2020-09-10T12:26:12+5:302020-09-10T12:29:31+5:30
बाणेगाव येथील प्रकार : सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या कारणासाठी मागितली वायरमनने लाच; पुढे काय झाले, वाचा बातमी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील डीपी दुरुस्त करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना एमएसईबीच्या वायरमनला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष दत्तात्रय हिप्परगी (वय २८, रा. नेमणूक बाणेगाव शाखा कार्यालय, कारंबा, रा. मार्डी, तालुका उत्तर सोलापूर) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे. बाणेगाव येथील शेतकºयाला शेतामध्ये कांद्याची लागवड करायची होती. त्यासाठी त्याला विहिरीतून पाणी काढायचे होते. मात्र त्या ठिकाणी वीज नसल्याने त्यांनी बाणेगाव येथील डीपीची पाहणी केली. डीपी खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संबंधित वायरमन सुभाष हिप्परगी याच्याशी संपर्क साधला. सुभाष हिप्परगी याने डीपी दुरुस्त करण्यासाठी सर्व शेतकºयांमध्ये पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
शेतकºयांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला व वायरमनला पाच हजार रुपयांपैकी दीड हजार रुपयांची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार बनेवाले, महिला पोलीस नाईक स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार आदींनी पार पाडली.