सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामे हातावेगळी करण्यासाठी मंत्रालयात गेलेल्या महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना पाणीपुरवठ्याची १२७ कोटींची योजना मार्गी लावण्यासाठी उजनी धरणात पाणी राखीव असल्याबाबतचा पाटबंधारे खात्याचा नाहरकत दाखला आणा, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली आहे. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान या योजनेतून महापालिकेने टाकळी ते सोलापूर अशी समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १६८ कोटी खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर जीवन प्राधिकरणाने सर्वेक्षण करून १२७ कोटी खर्चाच्या कामास मान्यता दिली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी आयुक्तगुडेवार स्वत: ही फाईल घेऊन मुंबईला दोन दिवसांपूर्वी रवाना झाले आहेत. पण मंत्रालयातही आता राज्यभरातील कामे मार्गी लावण्याची घाई सुरू आहे. त्यामुळे दोन दिवस चर्चेला वेळ मिळाला नाही. शुक्रवारी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी आयुक्त गुडेवार यांना चर्चेला वेळ दिला. यावेळी जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत गुडेवार यांनी योजनेची माहिती सांगितली. फाईल पाहून प्रधान सचिव सिंग यांनी ही फाईल मंजूर करण्यासाठी उजनी धरणात पाणी राखीव असल्याबाबत पाटबंधारे खात्याचा नाहरकत दाखला आवश्यक असल्याचे सांगितले. टाकळी-सोलापूर जलवाहिनी ५० वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे, त्यावेळी उजनी धरण नव्हते. पण आता धरणात पाणी राखीव झाल्याने हा दाखला जोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही योजना प्रतीक्षेत राहिली. ----------------------------सोलापूर-टाकळी जुन्या जलवाहिनीला समांतर नवीन जलवाहिनी टाकण्याचा हा नवा प्रस्ताव आहे. प्रधान सचिवांनी सुचविल्याप्रमाणे उजनीची एनओसी सोमवारी मिळवली जाईल आणि ही योजना आचारसंहितेच्या आधी मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न राहील. - चंद्रकांत गुडेवारआयुक्त
जलवाहिनीची मंजुरी अडकली
By admin | Updated: August 23, 2014 00:58 IST