प्रेयसीवर ब्लेडने वार करून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सोलापूरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:44 IST2018-10-20T14:43:32+5:302018-10-20T14:44:45+5:30
दोघे गंभीर : मेकॅनिकी चौक येथील प्रकार

प्रेयसीवर ब्लेडने वार करून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सोलापूरातील प्रकार
सोलापूर : मुलीच्या घरच्यांचा लग्नास विरोध असल्याने चिडलेल्या तरूणाने प्रेयसीवर ब्लेडने वार करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मेकॅनिकी चौकातील पिझ्झा सेंटरवर घडला.
सूरज रेवणसिद्ध म्हमाणे (वय २२, रा. ताडीवाला रोड, सारीपुत्त बुद्ध विहार, पुणे) हा आपल्या प्रेयसीबरोबर एका हॉटेलमध्ये आला होता. प्रेयसी बरोबर गप्पा मारत असताना दोघांमध्ये लग्नावर चर्चा झाली. मुलीच्या घरच्यांचा याला विरोध असल्याचे लक्षात येताच सूरज म्हमाणे याने पे्रयसीवर ब्लेडने वार केले. एवढ्यावर न थांबता त्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
दोघे गंभीर जखमी झाले. सूरज म्हमाणे याला आकाश धुळे याने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. मुलीस तिच्या नातेवाईकांनी एका खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
एकमेकांचे नातेवाईक...
- सूरज म्हमाणे व मुलगी हे दोघे नातेवाईक आहेत. मुलगा पुणे येथे राहतो तर मुलगी हैदराबाद येथील आहे. दोघांचे नातेवाईक सोलापुरात राहतात. ते दोघे नातेवाईकांकडे येत असतात. १५ दिवसांपूर्वी मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या आई-वडिलांना मुलगी देता का असे विचारले होते. मुलीच्या घरच्यांनी या प्रस्तावाला नकार दिला होता. या कारणावरून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर योग्य ती कारवाई व योग्य तो तपास केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी लोकमतशी बोलताना दिली.