Veerashaiva's Mahakumbh fair is held in Kashi from January | काशी येथे जानेवारीपासून वीरशैवांचा महाकुंभ मेळा
काशी येथे जानेवारीपासून वीरशैवांचा महाकुंभ मेळा

ठळक मुद्दे१६ फेब्रुवारी रोजी पंचाचार्यांचा भव्य अड्डपालखी सोहळा पार पडणार२० फेब्रुवारी रोजी साजरा होणाºया महाशिवरात्रीनिमित्त विद्वत्तसभा होणार२७ जानेवारी रोजी महिलांचे श्रीसिद्धांतशिखामणीचे अखंड पारायण होणार

सोलापूर : काशीपीठाच्या श्री जगद्गुरु विश्वाराध्य गुरुकुलाच्या शतमानोत्सवानिमित्त वाराणशीत १५ जानेवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत वीरशैवांचा महाकुंभ भरणार असून, या महाकुंभाचा शुभारंभ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीसिद्धांतशिखामणी आणि त्याच्या अ‍ॅपचे उद्घाटन करणार असल्याची माहिती काशीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

काशीपीठातील गुरुकुल हजारो वर्षे प्राचीन असून, १९१८ साली तत्कालीन पंचपीठेश्वर काशीमध्ये आले असताना त्यांनी या गुरुकुलाचे श्री जगद्गुरु विश्वाराध्य गुरुकुल असे नामकरण केले. त्या नामकरणाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल शतमानोत्सव सोहळा हाती घेण्यात आला आहे. १९ जानेवारी २०२० रोजी पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या १०८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी हानगल कुमारस्वामीजींचाही स्मरणोत्सव आहे. या दोन्हीचे औचित्य साधून वाराणशीत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करणार आहेत. त्यांच्याच हस्ते डॉ. शे. दे. पसारकर यांनी संपादन केलेल्या श्री काशी विश्वाराध्य गुरुकुल या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. 

२७ जानेवारी रोजी धारवाडच्या कविता हिरेमठ, बंगळुरुच्या टी. एस. इंदुकला यांच्या नेतृत्वाखाली ३०० महिलांचे श्रीसिद्धांतशिखामणीचे अखंड पारायण होणार आहे. ३१ जानेवारी रोजी पद्मश्री डॉ. बाबासाहेब कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली वीरशैव समाजातील दिवंगत मान्यवरांचा विशेष स्मरणोत्सव साजरा होणार आहे. ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत शिवनाम सप्ताह साजरा होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी गुरुकुलात शिकून गेलेले आणि लिंगैक्य झालेले पंचपीठ आणि निरंजनपीठाचे जगद्गुरु, विविध मठांचे मठाधिपती आणि शास्त्रीगणांचा सामूहिक स्मरणोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत विविध ग्रंथांचे सामूहिक पारायण होणार आहे. पत्रकार परिषदेला श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सदस्य सिद्धेश्वर बमणी, सोमशेखर देशमुख, बाळासाहेब भोगडे, बाबुराव मैंदर्गीकर, प्रा. अनिल सर्जे, राजशेखर बुरकुले, महेश अंदेली, रेवणसिद्ध वाडकर आदी उपस्थित होते. 

१६ फेब्रुवारीला अड्डपालखी सोहळा
- १६ फेब्रुवारी रोजी पंचाचार्यांचा भव्य अड्डपालखी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात शंभराहून अधिक विविध वाद्यांसह लोककलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात गुलबर्गा जिल्ह्यातील शाखापूर (ता. जेवरगी) येथील तपोवन मठाचे श्री सिद्धाराम शिवाचार्य महाराज दोन हजार भक्तांसह सहभागी होणार आहेत. या उत्सवाची संपूर्ण सेवा त्यांनी स्वीकारली आहे. तत्पूर्वी १४ फेब्रुवारी २०२० रोजी काशी गुरुकुलातील काशी वीरशैव विद्वत्तसंघाचा हीरक महोत्सव आणि शिवाचार्य महासंमेलन होणार आहे. या सोहळ्यात गुरुकुलचे आजी-माजी विद्यार्थी यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रातील शिवाचार्य मंडळी सहभागी होणार आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त विद्वत्तसभा, पुरस्कारांचे वितरण
- २० फेब्रुवारी रोजी साजरा होणाºया महाशिवरात्रीनिमित्त विद्वत्तसभा होणार असून, त्यात विद्वत्तपूजन, ग्रंथप्रकाशन होणार आहे. याच कार्यक्रमात श्री जगद्गुरु विश्वाराध्य विश्वभारती पुरस्कार, पं. व्रजवल्लभ द्विवेदी शैवभारती पुरस्कार, कोडीमठ साहित्य पुरस्कार, लिं. सिंधूताई सुभाष म्हमाणे मातृशक्ती पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

Web Title: Veerashaiva's Mahakumbh fair is held in Kashi from January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.