सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना बिलाची अवास्तव आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:26 IST2020-10-30T13:24:18+5:302020-10-30T13:26:01+5:30
झेडपी सदस्यांची तक्रार: कारवाईबाबत जिल्हाधिकाºयांची परवानगी घेणार

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना बिलाची अवास्तव आकारणी
सोलापूर : शहरात कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाºया हॉस्पिटलकडून आकारलेले जादा बिल महापालिकेने वसूल केले, पण ग्रामीणमधील खासगी रुग्णालयाची तपासणी कोण करणार असा सवाल जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी आरोग्य समितीच्या सभेत उपस्थित केला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा सभापती दिलीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला अरुण तोडकर, नीलकंठ देशमुख, अतुल खरात, अण्णाराव बाराचारे, स्वाती कांबळे, रुक्मिणी ढोणे, शिलवंती भासगी, प्रभावती पाटील उपस्थित होते. सध्या ग्रामीणमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी दिली आहे. पण या रुग्णांलयामध्ये अवास्तव बिल लावले जात आहे अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
सोलापूर शहरात महापालिकेने अशा तक्रारी आल्यावर बिलाची तपासणी करण्यासाठी आॅडिटर नेमले आहेत, पण ग्रामीणमधील बिलाची तपासणी कोण करणार असा सवाल सदस्यांची उपस्थित केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव यांनी शासनाने ठरवून दिलेल्या निकषापेक्षा जादा बिल आकारणा?्या खासगी हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी परवानगी मागितली जाईल असे सांगितले.
यावेळी सदस्यांनी कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजनेवर चर्चा केली. काही तालुक्यात रुग्ण कमी झाले असे वाटत असले तरी तालुकास्तरावरील कोविड रुग्णालये सुरूच ठेवावीत. सर्व सदस्यांनी नागरिकांना अँटिजेन चाचणी करण्याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याबाबत सूचना देण्यात आली.
शवविच्छेदन बंधनकारक...
ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना शवविच्छेदन बंधनकारक असल्याच्या सूचना सभापती चव्हाण यांनी यावेळी दिल्या. परिचरांना तीन हजार मानधन आहे, ते दहा हजार करण्यात यावे असा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच ७० कर्मचा?्यांच्या वेतनासाठी गेल्या तीन महिन्यांपासून शासनाकडून निधी आला नाही. याबाबत शासनाला तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.