केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांचे डिजिटल फलक हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:24 IST2019-08-31T13:21:15+5:302019-08-31T13:24:12+5:30
सोलापूर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई; भाजप कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू

केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांचे डिजिटल फलक हटविले
सोलापूर : महाजनादेश यात्रेच्या समारोपनिमित्त रविवारी सोलापुरात भाजपाची सभा होणार आहे. या सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील चौकाचौकात भाजप कार्यकर्त्यांनी लावलेले डिजिटल फलक महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी हटविले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील चौकाचौकात बेकायदा डिजिटल उभे केले आहेत. कार्यकर्त्यांनी नो डिजिटल झोनमधील जागा रिकामी सोडली नाही. त्यामुळे याची दखल घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महापालिका आयुक्त दिपक तावरे यांना बेकायदा डिजीटल फलक हटविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलीस बंदोबस्तात सात रस्ता, पार्क चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, चार पुतळा परिसर येथील बेकायदा डिजीटल हटविले आहेत. चौकात भल्या मोठया डिजीटल फलकावर उभारण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवरांच्या छबी उतरविण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता असून महापौरही भाजपाच्याच आहेत.