Solapur: दंड न भरलेल्या अडीच हजार वाहनधारकांना वाहतूक शाखेने पाठवल्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार
By Appasaheb.patil | Updated: February 8, 2023 13:17 IST2023-02-08T13:16:20+5:302023-02-08T13:17:02+5:30
Traffic Police: आवाहन, सांगून, नोटीस व मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Solapur: दंड न भरलेल्या अडीच हजार वाहनधारकांना वाहतूक शाखेने पाठवल्या नोटिसा, कोर्टात हजर रहावे लागणार
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - आवाहन, सांगून, नोटीस व मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांना आता न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीत हजर राहून प्रलंबित दंडाची रक्कम भरण्यासंदर्भात सोलापूर शहरातील १ लाख २२ हजार तर सोलापूर ग्रामीण भागातील ९० हजार ९६८ वाहनधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. प्रलंबित दंड न भरल्यास वाहनधारकांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई- चालान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येते. सदर ई-चालान प्रणालीद्वारे कारवाई केलेल्या वाहनधारकांना एसएमएसद्वारे सदर चालानची रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात येतात. सूचना देऊनदेखील वाहनधारकांनी विचारण्याचे दंडाची रक्कम अद्याप तडजोड रकमेचा भरणा केलेला नाही, अशा वाहनधारकांना पुन्हा संधी देण्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) मुंबई कार्यालयाकडून एसएमएसद्वारे संदेश पाठवून प्रलंबित दंड भरण्याबाबत करण्यात आलेले आहे, तसेच जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सोलापूर व पोलिस निरीक्षक वाहतूक व प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत वाहनचालकांना प्रलंबित दंड भरण्याबाबत नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
नोटीस मिळाली तर हजर राहावे लागणार
वाहतूक नियम न पाळल्याबददल ज्या- ज्या वाहनधारकांना दंड भरण्याबाबत नोटीस मिळाली आहे. त्या वाहनधारकांनी ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या लोकअदालतीत हजर राहून दंडाची रक्कम भरावी. आपली काय तक्रार, अडचण असल्यास त्यासंदर्भातील माहिती लोकअदालतीत द्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. नोटीस मिळाली तर हजर राहावे लागणारच आहे, अन्यथा दंडाची रक्कम भरून आपण पुढील कारवाई टाळू शकतो, असेही वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याठिकाणी भरू शकता दंडाची रक्कम
वारंवार सांगूनही दंड न भरणाऱ्या वाहनधारकांवर आता कठोर कारवाई होणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनी आपल्या वाहनावर प्रलंबित असलेल्या दंडाची रक्कम त्वरित भरावी. दंडाची रक्कम पोलिस अधीक्षक कार्यालय, शहर पोलिस आयुक्तालय, संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात दंडाची रक्कम भरण्याची सोय करण्यात आली आहे.