तब्बल बारा तासांनंतर डिव्हायडरवर चढलेला डंपर खाली उतरवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 17:58 IST2021-02-28T17:57:57+5:302021-02-28T17:58:03+5:30
सात रस्ता - गांधीनगर मार्गावरील घटना : कारला वाचवण्याच्या प्रयत्नात घडला प्रकार

तब्बल बारा तासांनंतर डिव्हायडरवर चढलेला डंपर खाली उतरवला
सोलापूर : कारला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर चढलेला डंपर तब्बल १२ तासांनंतर खाली उतरवला. सात रस्ताहून गांधीनगरकडे जाणाऱ्या रोडवर हॉटेल प्रथम समोर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत खडी वाहून नेणारा डंपर (क्र.एमएच-१३/एएक्स-३९४२) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात रस्त्यावरून गांधीनगरकडे जात होता. डंपर हॉटेल प्रथम समोर आला असता पाठीमागून आलेल्या अज्ञात कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अचानक मागून पुढे आलेल्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात वेगात असलेला डंपर डिव्हायडरवर चढला. पुढे जाऊन तो डिव्हायडरमधील एमईसीबीच्या खांबाजवळ थांबला. डंपर डिव्हायडरवर चढल्यामुळे कारला होणारा अपघात वाचला. डंपरचालक खाली उतरून तेथून निघून गेला.
पहाटे डिव्हायडरवर चढलेला डंपर दुपारी एक वाजेपर्यंत तशाच अवस्थेत उभा होता. सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळी आले. डंपरमधील अडीच ब्रास खडी प्रथमत: काढून दुसऱ्या वाहनांमध्ये भरण्यात आली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने डिव्हायडरवरील डंपरला हवेत उचलण्यात आले. नंतर तो डंपर रस्त्यावर ठेवण्यात आला. दुपारी तीन तीस वाजता डंपर तेथून हलवण्यात आला व वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
याच ठिकाणाची तिसरी घटना
- गेल्यावर्षी याच ठिकाणी अशाच पद्धतीने एक कार सायंकाळी सातच्या सुमारास रोडवरील वाहनांना धडक देत डिव्हायडरवर चढली होती. एक ओम्नी कार मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात डिव्हायडरवर चढून रस्त्यावर पडली होती.
------------
यापूर्वीही डिव्हायडरवर वाहने चढण्याचा प्रकार घडला होता. वास्तविक पाहता हॉटेलसमोरील वळण धोकादायक ठरत आहे. त्यासाठी डिव्हायडरची उंची वाढवणे गरजेचे आहे. डंपर ताब्यात घेण्यात आला असून तो सदर बाजार पोलीस ठाण्यात पाठविला आहे. अपघात किंवा अपघातामध्ये नुकसान न झाल्यामुळे अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
- संजीव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.