टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:29 IST2019-01-25T14:28:22+5:302019-01-25T14:29:45+5:30
सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, ...

टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव
सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा २८ जानेवारी रोजी होणार आहे. किसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या चळवळीला पाठबळ देण्यासाठी महापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला आहे.
यात म्हटले आहे, टाटा कंपनीने लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवडी, ठोकरवाडी, मुळशी या सहा धरणांमध्ये कृष्णा खोºयातील तुटीच्या खोºयातील ४८.९७ टीएमसी पाणी अडविले आहे. या पाण्यावर ते भिरा, भिवपुरी, खोपोली या ठिकाणी वीजनिर्मिती करुन मुंबई शहराला वीज विक्री करीत आहेत. टाटा कंपनीचा पाणी व्यवहार राज्याच्या जलनितीच्या धोरणाप्रमाणे नाही. जलकायद्याच्या विद्युत कायद्याच्या, पर्यावरणाच्या आणि विशेष म्हणजे राज्य घटनेच्या कलम ३८ व ३९ च्या तरतुदीप्रमाणे नाही. वीजनिर्मितीला इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोलापूर शहर हे सतत दुष्काळी, तुटीच्या खोºयात आहे. त्याचाही विचार व्हावा.
उजनीचे पाणी अस्वच्छ म्हणून...
- सोलापूरला उजनी धरणातून पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनीतील पाणी अत्यंत धोकादायक आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी स्वच्छ व चांगले आहे. उजनी धरणातील पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. टाटा व कोयना धरणातील पाणी सोलापूर शहरासाठी मंजूर झाल्यास पाणी उताराने आणणे शक्य होणार आहे. सध्या पंपिंगद्वारे पाणी उचलण्याचा विजेचा मोठा खर्च वाचणार आहे. नैसर्गिक हक्काचे पाणी सोलापूर शहराला मिळावे अशी मागणी आम्ही करीत आहोत.