माझ्यातील परिवर्तनाची गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 02:32 PM2019-09-09T14:32:41+5:302019-09-09T14:33:09+5:30

स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे.

The transformation thing in me! | माझ्यातील परिवर्तनाची गोष्ट !

माझ्यातील परिवर्तनाची गोष्ट !

Next

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या दुसºया सत्रात शिकत असताना मी अभियांत्रिकीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. पण घरातून विरोध झाल्यामुळे मी नाईलाजाने नावडत्या विषयांचाही अभ्यास चालू ठेवला आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकीच्या शिक्षणाने जरी माझी घुसमट वाढवली होती, तरी त्या शिक्षणाने चांगला पगार देणारी एक नोकरी मात्र मला मिळवून दिली. या नोकरी दरम्यान मी कोल्हापुरात केलेल्या एका वर्षाच्या वास्तव्याने माझ्या जीवनाला एक महत्त्वपूर्ण कलाटणी दिली !
या काळात आॅफिस संपल्यानंतर संध्याकाळी मी माझ्या बॅचलर सहकाºयांसह टेबल टेनिस, कॅरम इ. खेळ खेळत असे, तर कधी फेरफटका मारायला शहरात जात असे. असा फेरफटका मारताना अधूनमधून आम्ही संध्याकाळच्या काही व्याख्यानमालांना मी हजेरी लावली. या काळात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आवारातील व आजूबाजूच्या परिसरातील अनेक व्याख्याने आम्ही ऐकली. यातील तीन व्याख्याने मला आजही पुसटशी आठवतात. यातील एक होते ते म्हणजे डॉ. तारा भवाळकर यांचे़, दुसरे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे आणि तिसरे डॉ. गंगाधर पानतावणे यांचे! 

डॉ. तारा भवाळकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाल्या होत्या की, आज आपण साजरा करत असलेल्या अनेक सणांचा आपल्या धर्माशी तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. अनेक सण हे मुळातील लोकोत्सव आहेत व ते धर्म ही संकल्पना अस्तित्वात येण्याच्या आधीपासून साजरे केले जात आहेत. माझ्यासाठी हा नवा विचार होता. 

प्राचार्य शिवाजीराव भोसले भारतातील महामानवांविषयी बोलताना म्हणाले होते की, तुम्हीही तुमच्या आयुष्यातील दहा वर्षे समाजासाठी बाजूला काढून ठेवा; म्हणजे तुमचाही इतिहास लिहिताना मला खूप आनंद वाटेल! भोसले सरांचे हे विधान माझ्या काळजात कोरले गेले. डॉ. पानतावणे यांनी त्यांच्या व्याख्यानातून महात्मा फुले यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती दिली होती. त्या माहितीनेही मी मोठ्या प्रमाणात प्रभावित झालो.

ही आणि अशी व्याख्याने ऐकताना माझ्या मनात विचारांची मोठमोठी वादळे निर्माण होऊ लागली. मला वाटू लागले की, आपण अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन एक अधिकारी तर झालो; पण आजही आपल्या समाजाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींची, त्याच्या समस्यांची, त्याच्या दैनंदिन संघर्षाची आपल्याला काहीच माहिती नाही. हे योग्य नाही. हे सर्व आपण जाणून घेतलेच पाहिजे!
यानंतरचे सुमारे वर्षभर रात्र रात्र जागून मी अनेक पुस्तके वाचून काढली. या वाचनात प्रामुख्याने महामानवांच्या जीवनचरित्रांचा समावेश होता.

१९९८ च्या त्या वर्षभरात कोल्हापूरच्या करवीर नगर वाचनालयातील सुमारे ३० पुस्तके मी वाचून काढली. त्यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अब्राहम लिंकन, विन्सस्टन चर्चिल इ. पराक्रमी पुरुषांबरोबरच अ‍ॅडॉल्फ हिटलर सारख्या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनचरित्रांचाही समावेश होता. या वाचनापूर्वी मी जगलेले आयुष्य यानंतर मला अगदीच सुमार दर्जाचे वाटू लागले. त्यामुळे त्यानंतरच्या १५-२० वर्षांच्या काळातही डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, मदर तेरेसा, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध, सम्राट अशोक या आणि अशा अनेक महामानवांचे  चरित्रग्रंथ मी मोठ्या आवडीने वाचून काढले.

 या सर्व पुस्तकांच्या वाचनामुळे माझ्या जीवनाला एक वेगळेच वळण लागले! आता केवळ स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच जगण्याऐवजी संपूर्ण समाजासाठी जगावे,असे मला तीव्रतेने वाटत आहे. माझ्यातील या सर्व परिवर्तनाचे श्रेय मी ऐकलेल्या व्याख्यानांना  आणि त्यानंतर केलेल्या वाचनालाच जाते!

- डॉ. रविनंद होवाळ
(लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

Web Title: The transformation thing in me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.