आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्ह्यातील साडेचार लाख बालकांना लस देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 10:25 IST2021-01-31T10:24:49+5:302021-01-31T10:25:36+5:30
सोलापूर : जिल्ह्यात आज दि.३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना ...

आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; जिल्ह्यातील साडेचार लाख बालकांना लस देणार
सोलापूर : जिल्ह्यात आज दि.३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५२ हजार ७३९ बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने पोलिओ लसीकरणाची जय्यत तयारी केली असून ७५३५ अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात ३२२७ पोलिओ लसीकरण केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर लस उपलब्ध असणार आहे. याशिवाय २१२ ट्रांझीट टीम आणि १३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. ३१ जानेवारी रोजी पोलिओपासून वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी २०२१ असे तीन दिवस आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती घरोघरी, वाडीवस्ती, ऊसतोड टोळी, वीट भट्टी याठिकाणी भेटी देऊन लस देणार आहेत, असेही स्वामी यांनी सांगितले.
सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजवून घ्यावी, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे.