आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:45 IST2025-03-06T21:43:29+5:302025-03-06T21:45:06+5:30

शिवसेना फोडून काही लोकांनी गद्दारी केली, असे या नेत्यांचे आधी म्हणणे होते.

Three leaders from Shiv Sena Uddhav Balasaheb Thackerays party joined Deputy Chief Minister Eknath Shinde Shiv Sena today | आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

Shiv Sena Eknath Shinde: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील तीन नेत्यांचा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. शिवसेनेते फूट पडल्यानंतर या तिघांनी शिंदेसेनेवर जोरदार प्रहार केले होते. शिवसेना फोडून काही लोकांनी गद्दारी केली, असे या नेत्यांचे म्हणणे होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या तिघांचा शिंदेसेनेत प्रवेश होईल, अशी चर्चा होती. माजी मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हा प्रवेश होईल, असे काही नेत्यांचे म्हणणे होते. परंतु, हा प्रवेश पंढरपूरच्या महेश साठे यांच्या माध्यमातून झाल्याचे कालच स्पष्ट करण्यात आले होते.  

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा पडझड सुरू आहे. पक्षाचे नेते, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील यांचा गुरुवारी मुंबईत शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धवसेनेचे अमर पाटील यांना जिल्हाप्रमुख केले. अमर पाटील यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीनंतर हे तिघेही शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

अमर पाटील यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. उद्धवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून अमर पाटील आणि माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आले. दरम्यान, उत्तमप्रकाश खंदारे, शिवशरण पाटील आणि अमर पाटील यांचा गुरुवारी सायंकाळी मुंबईत एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे शिंदेसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी सांगितले होते. शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले आमदार म्हणून उत्तमप्रकाश खंदारे यांची ओळख आहे. त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले होते. शहर मध्य मतदारसंघातून शिवशरण पाटील आमदार झाले होते.

Web Title: Three leaders from Shiv Sena Uddhav Balasaheb Thackerays party joined Deputy Chief Minister Eknath Shinde Shiv Sena today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.