वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही संघर्ष करून यशस्वी झालेले तीन मित्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 13:14 IST2020-03-20T13:09:13+5:302020-03-20T13:14:11+5:30
यशोगाथा; पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, वडशिंगे, सापटणे अन् उपळाई येथील तरुण

वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही संघर्ष करून यशस्वी झालेले तीन मित्र !
माढा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१८ मध्ये ३८७ जागांसाठी घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात माढा तालुक्यातील वडशिंगे येथील पैलवान अक्षय आनंत जाधव, सापटणे (भो़) येथील सिध्देश्वर सतीश आवचर, उपळाई खु़ येथील अमित बाळासाहेब देशमुख हे २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे या तिघांचे वडिलांचे छत्र हरपले आहे. या तिघांच्याही जिद्दीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
वडशिंगे येथील अक्षय जाधवचा चुलत भाऊ विकास हा पैलवान असल्याने अक्षय लाल मातीमध्ये रमला होता. याच कुस्तीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा सिल्व्हर पदक मिळवत तर दोन वेळा सहभाग नोंदवला़ त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळवले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर चुलते अशोक जाधव यांनी दिलेल्या पाठबळामुळे लाल मातीमध्ये घडल्याने यश मिळाल्याची प्रतिक्रिया अक्षय यांनी दिली. त्याचे माजी पं़ स़ सदस्य बापू जाधव, रोहिदास कदम, मुख्याध्यापक विजय साठे, सुरेश कदम, धनाजी कदम, कल्याण बाबर, संदीप पाटील, वस्ताद पांडुरंग जाधव, माजी उपसरपंच आबासाहेब ठोंबरे, योगेश जाधव, अक्षय जगताप, बाबा सरडे यांनी कौतुक केले.
सापटणे भोसे येथील पहिला पोलीस उपनिरीक्षक पदाचा मान सिद्धेश्वर आवचर याला मिळाला आहे. तलवारबाजी स्पर्धेमध्ये नॅशनल सिल्व्हर मेडल पदक मिळविले व नॅशनल स्पर्धेत दोन वेळा सहभागी झाल्याचा फायदा त्यांना झाला. वडिलांच्या निधनानंतर आई व कुटुंबीयांनी दिलेली प्रेरणा व वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवून यश संपादन केल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सिध्देश्वर याने दिली. त्याने तिसºया प्रयत्नात हे यश मिळविले आहे. त्याचे सरपंच ज्योतीराम घाडगे, उपसरपंच संग्राम गिड्डे, पै़ अस्लम काझी, नवनाथ मराळ, बालाजी देवकुळे, केशव अवचर यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
उपळाई बुद्रूक येथील अमित देशमुख हे २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. अमित यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मानसिक व आर्थिकदृष्ट्या असे सर्वच सहकार्य त्यांचे मामा शरद पाटील यांनी केले. कष्ट व मेहनत घेत, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळविल्याची प्रतिक्रिया अमित याने दिली. अमित गेल्या ४ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता़ अखेर पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळविले आहे. त्याला डॉ़ संदीप भाजीभाकरे, रोहिणी भाजीभाकरे, स्वप्निल पाटील, शिवप्रसाद नकाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परिसरात निवडीची बातमी समजताच सर्वच स्तरातून यांच्यावर कौतुक होत आहे.