Solapur Crime : राहत्या घराच्या जागेच्या वादातून फोंडशिरस (ता. माळशिरस) येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन आरोपींना माळशिरस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांनी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. किसन महादेव वाघमोडे (वय २२), धर्मेंद्र महादेव वाघमोडे (वय २८) व अंकुश महादेव वाघमोडे (वय ३५, सर्व रा फोंडशिरस) अशी शिक्षा झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
सामाईक जागेवरून किरण वाघमोडे, अंकुश वाघमोडे, धर्मेंद्र वाघमोडे यांनी लोखंडी पाइपने डोक्यात मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने कै. नाना अण्णा वाघमोडे (वय ७०) यांना ठार मारल्याची फिर्याद मयताचा मुलगा बापू नाना वाघमोडे याने २० ऑक्टोबर २०२१ रोजी नातेपुते पोलिसात दिली होती.
तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर, स.पो.नि. महारुद्र परजणे, सहा. फौजदार अनिल गडदे, मा. सरकारी वकील एस. एस. पाटील, कोर्ट पैरवी सहायक पोलिस फौजदार शिवाजी घाडगे, हवालदार मारुती शिंदे आदी पोलिस पथकाने तपासादरम्यान आरोपीविरुद्ध सबळ असा पुरावा हस्तगत करून आरोपीविरुद्ध सत्र न्यायालय माळशिरस येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.
अशी झाली शिक्षा...
सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. डी. हुली यांनी सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून १५ जानेवारी २०२५ रोजी न्यायालयाने ।) भा.दं. वि कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावास तसेच ५०४, ५०६, ३४ मध्ये १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.