पवार, ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही; राज्यात महायुती ४५ पार करणार: दानवेंना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 18:46 IST2024-05-19T18:46:11+5:302024-05-19T18:46:28+5:30
रावसाहेब दानवे : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे घेतले दर्शन

पवार, ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही; राज्यात महायुती ४५ पार करणार: दानवेंना विश्वास
रविंद्र देशमुख सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रातदेखील महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा विश्वास आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, असं विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी पंढरपुरात केले. दानवे रविवारी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आ. समाधान आवताडे, सुभाष देशमुख, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे उपस्थित होत्या.
ते म्हणाले, राजकारणात काही होऊ शकतं. आम्ही तर त्यांना पाठिंबा मागितलेला नाही. आम्हाला त्यांची गरज पडणार नाही. आमचे ४०० निवडून येणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही. देशात लोकशाही आहे. त्यामुळे मनोज जरांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. देशातील मतदारराजा हुशार आहे. विधानसभेला उभे राहिले तर त्यावेळेस लोक ठरवतील. जनता कोणाला पाठिंबा देते हे पाहावे लागेल असंही त्यांनी नमूद केले.
आरएसएस आणि भाजप कधीच वेगळं होऊ शकत नाही. आरएसएस आमची मातृसंस्था आहे. राजकारणात आम्हाला सल्ला देतील किंवा इंटरफेअर करतील, असे मुळीच नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.