सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल

By Appasaheb.patil | Published: August 8, 2022 10:34 AM2022-08-08T10:34:03+5:302022-08-08T10:34:14+5:30

महावितरण ॲक्शन मोडवर; गावोगावी आता पथक टाकणार धाडी

There is no amnesty for electricity thieves in Solapur, if a mistake is found, a crime will be filed immediately | सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल

सोलापुरातील वीज चोरांना आता माफी नाही, चूक दिसल्यास थेट होणार गुन्हा दाखल

googlenewsNext

साेलापूर : घरगुती मीटरमध्ये फेरफार करणे, आकडा टाकून पंपाद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे आणि बेकायदा वीजजोड घेऊन वीजचोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पथके तैनात करण्यात आली असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हेही दाखल करण्याचे आदेशही महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत.

वीजचोरीचे प्रमाण शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात जास्त आहे. ग्रामीण भागात आकडा टाकून वीजचोरी केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. शहरी भागात घरगुती वीजमीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मीटरचे सील तोडून तांत्रिक बिघाड करणे, मीटरची परस्पर हाताळणी करणे, विजेच्या खांबावरील वायरमध्ये बिघाड करणे या प्रकारचे गुन्हे शहरी भागात करण्यात आले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल झाले असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले. वीजचोरी रोखण्यासाठी स्वतंत्र महावितरण पोलीस ठाणी सुरू करण्यात आली असली, तरी पोलिसांचे अधिकार कमी असल्याने वीजचोरांवर वचक ठेवणे पोलिसांना अडचणीचे होत असल्याचे सांगण्यात आले.

----------

चार महिन्यांत २०५ चोरीच्या घटना

एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांत वीजचोरीच्या २०५ घटना उघडकीस आल्या आहेत. यात सर्वाधिक घटना या बार्शी विभागात आढळून आल्या आहेत तर सर्वात कमी अकलूज विभागात आढळल्या आहेत. याशिवाय सोलापूर ग्रामीण, पंढरपूरसह सोलापूर शहरातही वीजचोर आढळून आले आहेत.

-----------

१ लाख ८८ हजार युनिटची चोरी

२०५ वीजचोरांनी चार महिन्यांत १ लाख ८८ हजार ७२६ युनिटची वीजचोरी केल्याची माहिती समोर आली आहे. मीटरमध्ये फेरफार करून मीटरची गती कमी केल्याने सर्वाधिक युनिट चोरी झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वात जास्त चोर ग्रामीण भागासह शहरी भागात आढळून आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

---------

२८ लाख ८४ हजारांचा दंड

वीजचोरी उघड झाल्यानंतर महावितरणकडून पंचनामा करण्यात येतो. किती युनिटची वीजचोरी केली त्याबाबतचा अहवाल तयार केला जातो. त्यानंतर सुरुवातीला संबंधित ग्राहकावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अशा पद्धतीने २०५ वीजचोरांना २८ लाख ८४ हजारांचा दंड ठोठावला आहे.

---------

एकही गुन्हा दाखल नाही

वीजचोर हे मुख्य तारेवर आकडा टाकून, मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करतात. या वीजचोरांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जर दंडात्मक कारवाई केल्यानंतर ठोठावलेला दंड न भरल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, या चार महिन्यात एकाही वीजचोरावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची नोंद आहे.

---------

वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. ही पथके ज्या ज्या ठिकाणी वीजचोरी होत असल्याचे आढळून येते, तेथे कारवाई करीत आहेत. जर कुठे वीजचोरी होत असेल तर संबंधितांनी जवळच्या महावितरण कार्यालयात माहिती द्यावी. संबंधितांवर कारवाई करू. तक्रारदारांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल

 

Web Title: There is no amnesty for electricity thieves in Solapur, if a mistake is found, a crime will be filed immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.