एप्रिल महिना तसेच १० मे पर्यंत गावोगावी कोरोनाचा कहर होता. नान्नज येथील ३२ बेडचे हाॅस्पिटल फुल्ल होते तर खेड येथील कोविड सेंटरमध्ये सर्वाधिक १८७ लोक क्वारंटाइन झाले होते. सोलापुरातील शासकीय तसेच खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती. कोरोना उपचारासाठी बेड मिळत नव्हता. दररोजच लोकांचे जीव जात होते. १० मे नंतर हळूहळू कोरोनाचा कहर कमीकमी होऊ लागला आहे. जून महिन्यात तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसत आहे.
२५० रुग्णसंख्या क्षमता असलेल्या खेड येथील कोविड सेंटरमध्ये एप्रिलमध्ये १८७ लोक क्वारंटाइन झाले होते. ही संख्या गुरुवारी अवघी २१ इतकी होती. कळमण येथील आरोग्य केंद्रात चार व नान्नज येथील सेंट लुक्स दवाखान्यात उत्तर तालुक्यातील चार लोक उपचार घेत आहेत. सोलापूर शहरातील शासकीय तसेच खासगी दवाखान्यात उत्तर तालुक्यातील लोक कोरोनावर उपचार घेत असले तरी ही संख्या एप्रिल व मे महिन्यातील संख्या लक्षात घेता फारच कमी झाली आहे.
---
खेड येथील कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत ५३२ पाॅझिटिव्ह लोक दाखल झाले होते. त्यापैकी ४५१ लोक बरे होऊन घरी गेले तर ६० लोकांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, मनपा रुग्णालय तसेच खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
----
लसीकरण झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाचा त्रास सोसल्याने लोक आता दक्षता घेत आहेत.
- श्रीकांत कुलकर्णी
तालुका वैद्यकीय अधिकारी
----