सोलापूरमध्ये बिअरची बाटली डोक्यात फोडून तरुणाला केलं जखमी
By विलास जळकोटकर | Updated: June 12, 2023 17:42 IST2023-06-12T17:41:44+5:302023-06-12T17:42:06+5:30
जखमी गोपाळ हा वैदूवाडी भवानी पेठ येथून स्टेशन रोडवरील महापौर बंगल्यासमोरील रोडवर कामानिमित्त आला होता.

सोलापूरमध्ये बिअरची बाटली डोक्यात फोडून तरुणाला केलं जखमी
सोलापूर: जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी करण्याचा प्रकार सोलापुरातील महापौर बंगल्यासमोर घडला. रविवारी रात्री १०:१५च्या सुमारास ही घटना घडली. गोपाल दुर्गा वरगंटी (वय- २७, रा. वैदुवाडी, भवानी पेठ, सोलापूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.यातील जखमी गोपाळ हा वैदूवाडी भवानी पेठ येथून स्टेशन रोडवरील महापौर बंगल्यासमोरील रोडवर कामानिमित्त आला होता.
रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दीपक व्यंकप्पा शिवराज याने त्याला गाठले. जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी त्याने गोपाळच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. यामुळे त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहिलं. तातडीने जखमीचा मित्र सतीश शिरकल याने रात्री पावणेअकराच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल गाठलं आणि उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून, तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.