ज्याच्या त्याच्या हाती पाना- करवत; अख्खं गाव करतंय 'प्लंबर'चं काम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:58 IST2022-12-23T16:57:59+5:302022-12-23T16:58:32+5:30
आजमितीला आपणांस वेगवेगळ्या गावांच्या वेगवेगळ्या चालीरीती व वेगवेगळी परंपरा असते, असे अनेक ठिकाणी ऐकायला मिळते.

ज्याच्या त्याच्या हाती पाना- करवत; अख्खं गाव करतंय 'प्लंबर'चं काम !
दीपक दुपार
सोलापूर: आजमितीला आपणांस वेगवेगळ्या गावांच्या वेगवेगळ्या चालीरीती व वेगवेगळी परंपरा असते, असे अनेक ठिकाणी ऐकायला मिळते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील वरळेगाव या गावाची वेगळी ओळख आहे. या गावातील ९० टक्के पुरुष हे प्लंबिंगचे काम करणारे आहेत. त्यामुळे या गावाची ओळख "व्हिलेज ऑफ प्लंबर' बनली आहे.
आज या गावात जवळपास ४०० पेक्षा अधिक जण प्लंबिंगचे काम शिकलेले आहेत. १३०० लोकसंख्या असलेल्या या गावात केवळ पाच व्यक्ती वेगळे काम करीत आहेत. यामध्ये दोन शिक्षक, एक मुख्याध्यापक, एक ग्रामसेवक, एक पोलीस हे इतरत्र कार्यरत आहेत. या व्यवसायातून जिल्ह्याच्या जवळपासच्या होती.
सुरुवात कशी झाली ?
गावची संपूर्ण शेती जिरायती असल्यामुळे शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असे; त्यामुळे त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शहरात जावे लागते; त्यामुळे गावातील दिवंगत भीमा सुतार यांनी १९८५ नंतर पहिल्यांदा प्लंबिंगचे काम सुरु केले. त्यांच्यासोबत दिवंगत शंकर तरंगे, दिवंगत रघुनाथ हाक्के आणि अनिल देवकर यांनी काम केले व गावातील इतर मुलांनादेखील काम शिकवलं. आज गावात ४०० पेक्षा अधिक प्लंबर आणि प्लंबिंग कंत्राटदार आहेत.
जिल्ह्यात आणि मुंबई तसेच इतर राज्यांतील इतर ठिकाणी प्लंबिंगची कामे आज गावातील युवक घेत आहेत. गावात पूर्वी जुनी, मातीची, कुडाची घरे होती.
त्या जागी आता पक्की घरे पाहायला मिळतात. सोलापूर शहरात अनेकांची स्वतःची जागा आणि घरे आहेत. विशेष म्हणजे ७० टक्के लोक दरवर्षी आयटी रिटर्न भरतात.
आमच्या गावास व्हिलेज ऑफ प्लंबर असलेले राज्यातील पहिलेच गाव म्हणून ओळख मिळाली, त्याचा आम्हा सर्व गावकऱ्यांना अभिमान आहे.
-श्रीमंत हावके, माजी सरपंच
कधी काळी निराशेच्या गर्तेत असलेल्या या गावाला प्लंबिंग व्यवसायामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. आम्ही राज्यभरात प्लंबिंगची कामे करतो.
- यशवंत सोंडगे, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर