चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली
By काशिनाथ वाघमारे | Updated: January 4, 2024 19:40 IST2024-01-04T19:40:16+5:302024-01-04T19:40:30+5:30
ही घटना गुरुवारी अकलूज बायपास रोडवर एका हॉलसमोर घडली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉटेलमध्ये घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली
सोलापूर : कारखान्याकडे गाळपासाठी ऊस घेऊन निघालेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हाॅटेलमध्ये घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हॉटेलसमोर लावलेल्या चार ते पाच मोटारसायकलींचा चुराडा झाला. ही घटना गुरुवारी अकलूज बायपास रोडवर एका हॉलसमोर घडली.
माळशिरस येथून आलेला उसाचा ट्रक (केए २८, एफ ४११२) हा जयसिंह चौकातून १०० फुटी बायपास रोडने महर्षी चौकाकडे निघाला असताना एका मल्टिफंक्शन हॉलसमोर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक हॉटेल समोरील चार ते पाच मोटरसायकलींचा चुराडा करीत हॉटेलमध्ये घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुर्घटनेनंतर बायपास रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. अकलूज पोलिसांनी तत्परता दाखवून क्रेनच्या साह्याने उसाने भरलेला ट्रक ओढून काढत बायपास रोडवरील वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास अकलूज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.