आप्पासाहेब पाटील, सोलापूर: येत्या ४ जूनपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांचा थरार रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी बुधवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली. डब्ल्यूएमपीएलच्या पहिल्या हंगामात सोलापूर स्मॅशर्स या संघाचाही समावेश असणार आहे.
या वर्षीच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग लिलावासाठी एकूण ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली. या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्स २ या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव ॲड. कमलेश पिसाळ, अपेक्स कौन्सिल सदस्य सुनील मुथा, विनायक द्रविड, श्री. सुशील शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजिंक्य जोशी, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सचिव चंद्रकांत रेंबुर्से, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, माजी अध्यक्ष दत्ता सुरवसे, सोलापूर स्मॅशर्स संघाचे प्रतिनिधी शुभम बागुल, तसेच कप्तान तेजल हसबनीस, आयकॉन खेळाडू ईश्वरी अवसारे, सपोर्ट स्टाफ तसेच जिल्हा संघटनेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एमपीएल २०२५ सहभागी संघ:1. 4S पुणेरी बाप्पा 2. PBG कोल्हापूर टस्कर्स 3. रत्नागिरी जेट्स 4. ईगल नाशिक टायटन्स 5. सातारा वॉरियर्स 6. रायगड रॉयल्स
डब्लूएमपीएल २०२५ सहभागी संघ1. पुणे वॉरियर्स 2. रत्नागिरी जेट्स 3. पुष्प सोलापूर 4. रायगड रॉयल्स