माण नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला; १०२ पैकी चार दरवाजे केले जप्त
By काशिनाथ वाघमारे | Updated: June 12, 2023 20:04 IST2023-06-12T20:04:31+5:302023-06-12T20:04:51+5:30
उर्वरित दरवाज्यांचा शोध सुरू आहे.

माण नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला; १०२ पैकी चार दरवाजे केले जप्त
काशिनाथ वाघमारे
साेलापूर : वाढेगाव (ता. सांगोला) येथील माण नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारेच्या १०२ लोखंडी दरवाजे (बर्गे) चोरी प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणात पोलिसांनी वाढेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तानाजी उर्फ बंडू बापू चौगुले, सिद्धेश्वर राजाराम लेंडवे, श्रीकांत उर्फ माऊली सुभाष पवार, दत्तात्रय उर्फ पिंटू सुभाष पवार (सर्वजण रा. वाढेगाव ता. सांगोला) यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी मिळाली. या कोठडीत १०२ पैकी ४ दरवाजे पोलिसांनी जप्त केले आहेत.
वाढेगाव येथील माण नदी बंधा-यावरील काढून ठेवलेले २ लाख ९ हजारांचे १०२ लोखंडी वक्र व सरळ दरवाजे( बर्गे) पळवल्याची घटना २५ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली होती. त्यानंतर पाटबंधारे विभागाचे सांगोला शाखाधिकारी शैलेशकुमार सुखदेव पवार (रा. पंढरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली होती.
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय बगाडे यांनी गुन्हाचा तपास करून चौघांना अटक करून सांगोला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान तपास अधिकारी संजय बगाडे यांनी आरोपीकडून १०२ पैकी ४ दरवाजे जप्त केले आहेत. उर्वरित दरवाज्यांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.