Mohol Accident: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. सुरुवातीला कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. त्यात कंटेनर राँगसाइडवर जाऊन एका मिनी ट्रॅव्हल बसला धडकला. या अपघातात दुचाकीस्वार, बसचालकासह तिघे ठार झाले असून बसमधील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल रविवारी दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान कोळेगाव पाटीजवळ घडली.
या अपघातात दुचाकीस्वार दयानंद भोसले (वय ३५, रा. चंदनगर, लांबोटी ता. मोहोळ), मिनी बसचालक लक्ष्मण बासू पवार (वय ४०) व ३५ ते ४० वयोगटातील एक अनोळखी महिला असे तिघे ठार झाले आहेत. तर प्राची पाडुरंग मांढरे, छाया रतन शेडगे, रेखा दत्तात्रय चौधरी, कोमल अनिल जोरकर, भक्ती पांडुरंग मांढरे, बेबी सुधाकर गायकवाड, अनिता शंकर बारगे, संगीता रवींद्र शेडगे, कोमल सचिन मांढरे, रेश्मा नितीन चौधरी, सोनाली रमेश आडुळकर, सपना रमेश माहिते, अरव अरुण खाडे, परी अनिल जोरकर, सई गौस मांढरे हे जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर, अक्कलकोट दर्शन करून परत पंढरपूर येथे दर्शनासाठी निघालेली बस क्र. एम. एच. १२. के. क्यू ११ ७५ सोलापूर पुणे हायवेवरून पंढरपूरकडे जात असताना कोळेगाव पाटी येथे आली. तेव्हा अचानक रोड क्रॉस करणारे मोटार सायकल एम.एच. १३. सी.एन. ०३३५ ही विरुद्ध दिशेने चाललेल्या कंटेनरला (एन.एल. ०१ ए. ए. ७२०५) धडकून पुणे ते सोलापूरच्या दिशेने चाललेल्या बसला मध्यभागी धडक दिली. त्यामुळे बस रस्त्यावर पलटी झाली. यामध्ये प्रवासी जखमी झाले. जखमींना सोलापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या अपघातप्रकरणी तेजस्विनी मयूर मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.