लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:12 IST2025-12-01T09:11:24+5:302025-12-01T09:12:00+5:30
हा अपघात एवढा भीषण होता की, कार पुलावरून खाली जाऊन तीन-चार पलट्या होऊन ती चक्काचूर झाली.

लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
सोलापूर - चार दिवांसापूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य देवदर्शनासाठी पनवेलहून कुईवाडी येथून मामांना घेऊन तुळजापुराला देवदर्शनास निघाले. वाटेत बार्शी-लातूर रस्त्यावर घारी (ता. बार्शी) पासून एक कि.मी. अंतरावर जांभळबेट पुलावर कार आणि मालट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने अपघातात नवरा-नवरी वाचले.
रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृतामध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमी नवरा अनिकेत गौतम कांबळे (वय २८) आणि नवरी मेघना अनिकेत कांबळे (रा. दोघे पनवेल) यांना बार्शी येथील जगदाळेमामा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, कार पुलावरून खाली जाऊन तीन-चार पलट्या होऊन ती चक्काचूर झाली, तर मालट्रक रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. पुलावर गार्ड स्टोन नसल्याचे दिसून आले.
कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढले
अपघातातील कार (एम.एच. ४६ /एक्स. ७७२८) ही कुईवाडीहून तुळजापूरकडे जात होती, तर मालट्रक (एम. एच. २० / सी.टी. ८६८९) पांगरीहून बार्शीच्या दिशेने निघालेला होता. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय सातपुते, राहुल आलाट, राम शिंदे, अशिष सानप, पोलीस पाटील संतोष पिस्के घटनास्थळी धावले. दरम्यान घारी, पुरी, पांगरी येथील तरुण मदतीला धाऊन आले. जखमींना व मृतांना कारचे दरवाजे तोडून बाहेर काढले. पांगरी ग्रामीण रिग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह दाखल करण्यात आले.
मृतांमध्ये नवरीच्या मावशीसह पाच जणांचा झाला जागीच मृत्यू
गौतम भगवान कांबळे (वय ६५), जया गौतम कांबळे (६०, दोघे रा. पनवेल), नवरीची मावशी रिता धर्मेंद्र कांबळे (४७), सारिका संजय वाघमारे (४५), संजय तुकाराम वाघमारे (५०, रा. मार्केट यार्ड, वाघ वस्ती, कुडूवाडी) अशी मृतांची नावे आहेत. पांगरी पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू होती.