चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला
By काशिनाथ वाघमारे | Updated: October 27, 2023 18:05 IST2023-10-27T18:05:28+5:302023-10-27T18:05:41+5:30
शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांचा प्रवास सुरू झाला.

चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चळे (ता. पंढरपूर)तील मराठा समाजाचे दहा युवा कार्यकर्ते २५० किलोमीटर अंतर बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आहेत.
सुरेश औदुंबर मोरे, सिद्धनाथ वसंत खिलारे, पांडुरंग भारत खिलारे, दरलिंग गोरख मोरे, सुरेश कृष्णा मोरे, संतोष ज्ञानेश्वर मिसाळ, गणेश अंबादास कदम, तानाजी राजाराम घाडगे, बाबू चिंटू खिलारे आणि बिभीषण भानुदास मोरे हे दहा युवा कार्यकर्ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शेतातील मजुरीची कामे बाजूला ठेवून आंतरवाली सराटीला निघाले.
शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते कोंढारकी, गोपाळपूरमार्गे पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्यास साकडे घातले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याचे दर्शन घेऊन तरुण मार्गस्थ झाले.यावेळी पंढरपूर बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे, संदीप मांडवे, दिलीप गुरव, माउली अटकळे, बाळासाहेब गायकवाड, गणेश मोरे, निखिल रोकडे, उदय पवार, बंडू मोरे, प्रताप गायकवाड, दीपक मोरे, सजन मोरे, बबलू मोरे, सुधाकर मोरे, निखिल खिलारे, प्रदीप मोरे, युवराज गायकवाड, धनाजी वाघ, बबलू वाघ आदी उपस्थित होते.
...अन्यथा आंतरवालीतून बैलगाड्या मुंबई मंत्रालयाकडे
उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत हे कार्यकर्ते चर्चा करणार आहेत. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आंतरवाली येथून याच बैलगाड्यातून हे कार्यकर्ते मुंबई मंत्रालयाकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आठ ते दहा दिवसांत हे २५० किलोमीटर अंतर बैलगाडीतून प्रवास करीत कापणार आहेत.