स्वामीभक्तांची सुरक्षा रामभरोसे! गर्दी वाढली तरीही मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:44 IST2025-06-02T17:43:42+5:302025-06-02T17:44:13+5:30
मागील तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक बरखास्त करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'वर राहिली आहे.

स्वामीभक्तांची सुरक्षा रामभरोसे! गर्दी वाढली तरीही मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त नाही
अक्कलकोट - तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात पूर्वी भक्तांची गर्दी कमी असताना पोलिसांचे सुरक्षा पथक कार्यरत होते मात्र गर्दी तिपटीने वाढलेली असताना पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्वामी भक्तांची सुरक्षा रामभरोसे राहिली असून पुन्हा पोलिसांचे सुरक्षा पथक नेमण्याची मागणी होत आहे.
स्वामी समर्थ दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भक्त येतात. पाच वर्षांपूर्वी भक्तांची संख्या कमी होती. आता मागील तीन वर्षांत भाविकांची संख्या वाढलेली आहे. पूर्वी संख्या कमी असताना भक्तांच्या सुरक्षेसाठी सोलापूर येथील पोलिस मुख्यालयातील ६ पोलिस कर्मचारी, २ हवालदार असे मनुष्यबळ कार्यरत होते. प्रत्येकी १२ तासांची मंदिरात ड्युटी राहायची. मागील तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक बरखास्त करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सुरक्षा 'रामभरोसे'वर राहिली आहे. परिणामी चोऱ्या-माऱ्या वाढलेल्या आहेत. याला आवर घालण्यासाठी तत्काळ पोलिस बंदोबस्त पूर्ववत करण्याची मागणी स्वामी भक्तांमधून होत आहे.
महिला पोलिसांचाही बंदोबस्त द्या
जेव्हा भक्तांची वर्दळ कमी होती, तेव्हा पोलिसांचे सुरक्षा पथक कार्यरत होते. सध्या मनुष्यबळाची संख्या वाढलेली असताना सुरक्षा रक्षक काढून घेण्यात आले आहे. वाढती गर्दी व रोज चोरीला जाणारे मोबाइल, भक्तांना होणारी मारहाण, अरेरावी, उर्मटपणा या सगळ्या गोष्टी बंद करावयाच्या असल्यास पुन्हा सुरक्षा पथक कार्यरत करणे आवश्यक आहे. पूर्वी ६ पोलिस कर्मचारी, २ हवालदार होते. त्यात वाढ करून दिवसभरासाठी महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. या पोलिसांसाठी मंदिरात गार्ड रूम सुद्धा होती.
पूर्वी अनेक वर्ष मंदिरात पोलिस बंदोबस्त होता. मागील तीन-चार वर्षांपासून पोलिस बंदोबस्त काढण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. मंदिरासाठी वाढती गर्दी पाहता पोलिस बंदोबस्त आवश्यक असून यासाठी पोलिस विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवल्यास पोलिसांच्या राहण्याची तसेच भोजनाचीही व्यवस्था करू. - महेश इंगळे,
चेअरमन, स्वामी समर्थ मंदिर समिती
मी येण्यापूर्वी बंदोबस्त होता, असे सांगण्यात येते. तो बंदोबस्त आता बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. कोणत्या कारणास्तव नेमले आणि बंद केले याची मला काही माहिती नाही. सध्या गरजेचे वाटते. याबाबत वरिष्ठ कार्यालयास ही बाब कळविली आहे. ज्या ठिकाणी मंदिर शासन ताब्यात असते, त्या ठिकाणी शासन बंदोबस्त देते. खासगी असेल, तर त्यांच्याकडून नेमणूक होणे आवश्यक असते.- राजेंद्र टाकणे, पोलिस निरीक्षक.