‘स्वाभिमानी’ लोकसभेच्या ७ जागा लढण्याच्या तयारीत, रविकांत तुपकर यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:23 IST2018-11-24T13:21:33+5:302018-11-24T13:23:28+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फरपटत जाणार नाही; रविकांत तुपकर याचा दावा

‘स्वाभिमानी’ लोकसभेच्या ७ जागा लढण्याच्या तयारीत, रविकांत तुपकर यांची माहिती
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सात जागा सोडल्या तरच त्यांच्यासोबत आघाडी होऊ शकेल अन्यथा स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. संघटना आघाडीसाठी कोणासोबत ही फरपटत जाणार नाही, असा दावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोलापुरात बोलताना केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकारमंत्र्यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.आठ दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाºयांची गुरुवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी रविकांत तुपकर सोलापुरात आले होते. बैठकीनंतर त्यांनी संघटनेच्या राजकीय वाटचालीची माहिती दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देताना तुपकर म्हणाले, आम्ही आघाडीसाठी उत्सुक असलो तरी सात लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. तशी तयारी आम्ही मतदारसंघात सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सन्मानजनक वागणूक दिली तरच त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकेल, अन्यथा हातकणंगले या एका जागेसाठी आम्ही कधीच आघाडी करण्याचा विचार करणार नाही, त्या जागेवर खा. शेट्टी सहज निवडून येऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.