सोलापुरात पुन्हा एकदा घुमला ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज
By Appasaheb.patil | Updated: September 21, 2020 13:14 IST2020-09-21T12:29:15+5:302020-09-21T13:14:40+5:30
मराठा आरक्षणप्रश्नी पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद; शहरासोबत जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

सोलापुरात पुन्हा एकदा घुमला ‘एक मराठा...लाख मराठा’चा आवाज
सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरातील सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारलेल्या सोलापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकातून निघालेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांनी ‘एक मराठा.. लाख मराठा’ चा जयघोष केला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. सोमवारी पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदला नवीपेठ, कुंभार वेस, पार्क चौक, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक, सत्तर फुट रोड, बाळे, शिवाजी चौक, जुळे सोलापुरातील दुकानदार, व्यापाºयांनी आपली दुकाने स्वत:हून बंद ठेऊन आंदोलनास प्रतिसाद दिला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
सकाळी दहाच्या सुमारास सकल मराठा समाजाने शिवाजी चौकात आंदोलनासाठी गर्दी केली होती़ त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घरासमोर मराठा समाजाने आसुड ओढले़ त्यानंतर आ़ सुभाष देशमुख व आ़ प्रणिती शिंदे यांच्या घरासमोरही मराठा समाज बांधवाने आंदोलन केले़ जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी सोलापुरात जोरदार घोषणाबाजी करीत विश्रामगृहासमोरील आंदोलनात आसुड ओढून घेतले.
दरम्यान, कोंडी येथील मराठा समाज बांधवांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला़ याशिवाय देगांव येथे युवा सेनेचे गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
मराठापाठोपाठ धनगर समाजही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
एकीकडे राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करत असताना आता दुसरीकडे धनगर समाजही एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. धनगर समाजातील प्रमुख नेत्यांची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत २१ सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
याबाबत धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारनं अध्यादेश काढून धनगरांना एसटीचं आरक्षण लागू करावं, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येईल. मेगाभरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखून ठेवून मेगाभरती ताबडतोब सुरु करावी. यासाठी २१ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शेंडगे यांनी दिली आहे. तसेच या आंदोलनाची सुरुवात परभणीपासून होईल, येत्या आठवडाभरात आंदोलनाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.