... त्या बंद घरातून धुराचे लोट दिसताच मदतीला पोलिस आले धावून अन् पुढील अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 08:19 IST2021-10-02T08:18:36+5:302021-10-02T08:19:21+5:30
सोलापूर न्युज नेटवर्क

... त्या बंद घरातून धुराचे लोट दिसताच मदतीला पोलिस आले धावून अन् पुढील अनर्थ टळला
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील काझी गल्लीतील एका बंद घरात भर दुपारी अचानक धूर निघत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने गॅसचा स्फोट होवून होणारी दुर्घटना टळल्याने त्या गल्लीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या घटनेची हकिकत अशी, मंगळवेढा शहरातील काझी गल्लीत भर दुपारी एक वाजता शबाना समीर मुलाणी या महिलेच्या बंद घराच्या दरवाजाच्या फटीतून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे पाहून गल्लीतील नागरिक भयभीत झाले होते. याची खबर स.पो.नि.बापूराव पिंगळे यांना मिळताच त्यांनी पोलिस नाईक तुकाराम कोळी व खटकळे यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदर ठिकाणी पोलिस कर्मचारी गेल्यानंतर बंद घरातून धुराचे लोट येत असल्याचे दिसले.घराच्या पाठीमागील दरवाजातून पोलिसांनी घरात प्रवेश करून पाहिले असता चुलीजवळ ठेवलेले सरपण पेटल्याचे लक्षात आले. या जवळच सिलेंडर गॅस असल्याने काही अवधीमध्ये पोलिस आले नसते तर त्या गॅसचा स्फोट होवून दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली गेली.या पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील होणारी दुर्घटना टळल्याने गल्लीतील जमलेल्या लोकांचा जीव भांडयात पडला.सदर घराजवळ मोठया प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र घर बंद असल्यामुळे नेमके काय करावे हे त्यांच्या लक्षात येत नसल्याने घरातील धुराचे लोट वाढतच गेल्याचे सांगण्यात आले.