आठशे रुपयांसाठी मुलाने केली पित्याला मारहाण
By दिपक दुपारगुडे | Updated: February 1, 2024 18:28 IST2024-02-01T18:28:13+5:302024-02-01T18:28:28+5:30
यलमर मंगेवाडी येथील हणमंत येलपले यांनी ३० हजार रुपयांची मका विक्री केली होती.

आठशे रुपयांसाठी मुलाने केली पित्याला मारहाण
सोलापूर: मका विक्री करून आलेल्या पैशांतून स्वतःकडे ८०० रुपये का ठेवून घेतले, या कारणावरून चिडलेल्या पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याला शिवीगाळ, दमदाटी करत काठीने जबर मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास यलमर मंगेवाडी (ता. सांगोला) येथे घडली. याबाबत हणमंत शिवाजी येलपले यांनी मुलगा गणेश येलपले याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
यलमर मंगेवाडी येथील हणमंत येलपले यांनी ३० हजार रुपयांची मका विक्री केली होती. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास हणमंत येलपले हे जेवण करून घरी बसले होते. त्यावेळी मुलगा गणेशने वडिलांना मका विकलेले पैसे मागितले असता, त्यांनी त्याला ३० हजार रुपयांचा माल विकला असून, २९ हजार २०० रुपये त्याला देऊन स्वतःकडे ८०० रुपये ठेवून घेतले होते. त्यावेळी गणेशने त्यांना ‘तुला कशाला पैसे हवे आहेत, तू काय करणार आहे. पैशांचे... बाकीचे पैसेसुद्धा मला दे’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथेच पडलेल्या लाकडी दांडक्याने वडिलांच्या डोक्यात, तोंडावर, पाठीवर, हाता-पायावर मारहाण करून जखमी केले.