Solapur tourism ; पंढरपूर हे धार्मिक पर्यटनासोबत खुणावतंय तुळशीवनाचे सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:40 IST2019-01-28T12:39:10+5:302019-01-28T12:40:31+5:30
प्रभू पुजारी पंढरपूर : पंढरपूर म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं ते विठ्ठलाचं सावळं, सुंदर, मनोहारी रूप. पंढरीतील ती चंद्रभागा, इथला ...

Solapur tourism ; पंढरपूर हे धार्मिक पर्यटनासोबत खुणावतंय तुळशीवनाचे सौंदर्य
प्रभू पुजारी
पंढरपूर : पंढरपूर म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं ते विठ्ठलाचं सावळं, सुंदर, मनोहारी रूप. पंढरीतील ती चंद्रभागा, इथला टाळ, मृदंगाचा निनाद अन् भजन, कीर्तनाचे स्वऱ़़ या ठिकाणी तुम्हाला भक्तिभावासोबत धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येतो.
या भूवैकुंठ नगरीत पांडुरंगाचं व रुक्मिणीचं वेगळं मंदिर आहे. हे मंदिर शिल्पकलेचाही एक उत्तम नमुनाच़ मंदिराला एकूण आठ प्रवेशद्वार आहेत़ पूर्वेकडील प्रवेशद्वारास नामदेव पायरी म्हटलं जातं़ तिथून प्रवेश केल्यानंतर १० मीटर उंचीच्या दोन दीपमाळा व जवळच विष्णुवाहन गरुड व हनुमानाचं मंदिर दिसतं़ पुढं सोळा-खांबीत जाता येतं़ सोळा कोरीव दगडी खांब असून, गरुडस्तंभ चांदीच्या पत्र्यानं मढवलेला दिसतो़ इथं येणारा भाविक या खांबाला आलिंगन देऊन भेटतात.
गोपाळपूर रोडलाच नदीपात्रात विष्णुपद मंदिर आहे़ आजही या ठिकाणी श्रीकृष्ण व गायीच्या खुराचे ठसे दिसतात़ पंढरपुरात धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सुधारणा होत आहेत़ नामसंकीर्तन आणि नाट्यगृहही उभारले जात आहे.
कैकाडी मठाची रचना चक्रव्यूहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली इमारत आहे. एकदा मठात प्रवेश केला की, मध्येच प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने बघून झाल्यानंतर बाहेर पडता येते. त्यामुळे प्रदक्षिणेचा अवधी काही तासांवर जातो. प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी ३५ ते ४० मिनिटे लागतात. कैकाडी महाराजांचे पुतणे रामदास महाराज हे या मठाचे व्यवस्थापन पाहतात.
तुळशीवन एक पर्यटनस्थळच
भाव अन् भक्ती गीतांची सुमधुर धून, लख्ख प्रकाशात चमकणाºया विविध देवतांच्या मूर्ती, रंगीबेरंगी विविध आकारांची फुले, आठ प्रकारातील तुळशीची झाडे, भित्तीचित्रातून साकारलेले तब्बल २३ संतांचे जीवनचरित्र, मनमोहक कारंजे, शेजारच्या तलावात दिसणारे विविध पक्ष्यांचे थवे़़़ हे सर्व विहंगम दर्शन आता पंढरीत येणाºया भाविकांना पाहायला मिळत आहे, ते पंढरीतील यमाई-तुकाई तलावाशेजारीच तुळशी वृंदावनात़ सध्या ते एक पंढरीतील पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास अन् अन्नछत्र कार्यरत
पंढरपुरात येणाºया भाविकांसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने वेदांत भक्तनिवास, नव्याने बांधण्यात आलेले विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास यासह विविध मठ या ठिकाणी भक्तनिवासाची सोय होते़शिवाय मंदिर समितीचे अन्नछत्र सुरू आहे़