Solapur Flood: रिमझिम पाऊस सुरू होता. ११ वर्षांचा योगीराज बहिणीसोबत छोट्या गल्लीतून जात होते. त्याचवेळी भिंत कोसळली आणि नको ते घडलं. काळाने जागृतीपासून तिचा भाऊ कायमचा हिरावून घेतला. 'माझ्या भैय्याला आधी काढा. तो आत अडकलाय', या तिच्या आक्रोशाने सगळ्यांच्या काळजात पाणी पाणी झालं.
मुसळधार पावसाने ढवळस हेंबाडे येथील कुटुंबाचे आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकले जुन्या धाब्याच्या घराची भिंत कोसळली आणि क्षणार्धात बहीण-भावाच्या आयुष्याची ताटातूट झाली. भिंत अंगावर कोसळल्याने पाचवीत शिकणारा योगीराज जगन्नाथ हेंबाडे (वय ११) हा गुदमरून जागीच ठार झाला, तर अकरावीत शिकणारी बहीण जागृती हेंबाडे गंभीर जखमी झाली.
बहिणीसोबत जातानाच मृत्यूने मारली झडप
गावातील नवरात्र मंडळाचे पूजन करून आई-वडिलांसमवेत घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. बारीक सरी सुरू असल्याने भावंडे छत्री घेऊन बोळातून जात होती. इतक्यात अचानक भिंत कोसळली. योगीराज ढिगाऱ्याखाली चिरडला गेला, तर जागृतीही अडकली. जीवघेण्या क्षणी ती आक्रोश करत होती. "माझ्या भैय्याला आधी काढा... तो आत अडकला आहे..."
नागरिकांनी धडपड करत तिच्या अंगावरचे दगड-माती दूर करून बाहेर काढले. मात्र, तिचा पाय मोडला आणि अंगावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर योगीराजला बाहेर काढले असता, डोक्याला झालेला जबर मार आणि गुदमरल्याने त्याने जागीच प्राण सोडले होते.
योगीराजचा मृतदेहच सापडला
निष्प्राण शरीर पाहताच आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. गावातील लोकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. पावसाने कोवळा जीव हिरावून नेला. हेंबाडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते शेजारच्या घरात राहत होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.