Pandharpur Crime: पंढरपूरच्या कुंभार गल्लीत १५ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुरेखा जगताप आणि लखन जगताप या मायलेकांच्या दुहेरी हत्येचा रहस्यमय उलगडा तब्बल सात महिन्यांनी झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी चित्रपटालाही लाजवेल अशा या गुन्ह्याचा छडा लावत दोन मुख्य सूत्रधारांसह एका अल्पवयीन मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. साहेब, आमच्या गल्लीत खून झालाय, लवकर या अशी माहिती देणाराच आरोपी असेल अशी कोणालाच कल्पना नव्हती.
१५ जुलै २०२५ ची ती रात्र जगताप कुटुंबाला हादरवणारी ठरली. डिलिव्हरी बॉयचे काम करणारा लखन आणि त्याची आई सुरेखा यांची त्यांच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आरोपी इतके हुशार होते की त्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. लखनचे वडील घरी परतले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. घटनेनंतर काही वेळातच एका आरोपीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली, जेणेकरून पोलिसांचा संशय आपल्यावर येऊ नये.
तांत्रिक पुरावे ठरले निर्णायक
गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. सात महिन्यांपासून पोलीस अंधारात चाचपडत होते. मात्र, १८ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी स्वतः तपासाची धुरा हाती घेतली. त्यांनी परिसरातील डमडेटा, सीडीआर आणि लोकेशनची माहिती काढली. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, गुन्ह्याच्या वेळी परिसरातील काही ठराविक लोकांचे मोबाईल इनअॅक्टिव्ह होते. यादरम्यान बातमीदाराकडून मिळालेली एक पक्की खबर पोलिसांना थेट राजस्थानपर्यंत घेऊन गेली.
जोधपूरमध्ये पडली झडप
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोधपूरमध्ये सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खुनानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी खुनात वापरलेली धारदार हत्यारे चंद्रभागा नदीत फेकली. घरातील ५५ इंची टीव्ही देखील पुरावा म्हणून नदीत फेकून दिला. पोलीसांनी शोधमोहीम राबवून १० आणि ११ फेब्रुवारी रोजी नदीपात्रातून टीव्ही आणि शस्त्रे जप्त केली आहेत.
हत्येमागचे कारण काय?
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण हत्येमागे जागेचा वाद आणि अनैतिक संबंध ही दोन मुख्य कारणे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दुसऱ्य आरोपीचे मृतांशी असलेले वाद विकोपाला गेले होते, ज्याचा शेवट या दुहेरी हत्याकांडाने झाला. आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला तो निर्दोष असल्याचे नाटक करत राहिला, मात्र तांत्रिक पुरावे आणि पोलिसांच्या तपासासमोर त्याचा टिकाव लागला नाही. सध्या पंढरपूर सत्र न्यायालयाने आरोपींना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Summary : Pandharpur double murder solved after 7 months. The caller reporting the crime was the killer. Land dispute and illicit affair were the motives. Two arrested.
Web Summary : पंढरपुर में दोहरा हत्याकांड सुलझा। सूचना देने वाला ही हत्यारा निकला। ज़मीन विवाद और अवैध संबंध कारण। दो गिरफ्तार।